क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
एफसी गोवा एएफसी चॅम्पियन्स लीग-2 च्या तिसऱ्या गट फेरीच्या सामन्यात सोदी अरेबियातील दिग्गज अल-नासर संघाचा सामना करण्यासाठी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर सज्ज झाला आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता हा सामना होईल.
मॅनोलो माक्वेझच्या एफसी गोवा संघासाठी हा सामना एक आव्हान असेल. एफसी गोवाने त्यांच्या एसीएल 2 मोहिमेची सुरूवात घरच्या मैदानावर गटाच्या पहिल्या सामन्यात पराभवाने केली. या लढतीत त्यांना अल-झावरा एफसी विरूद्ध 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुशान्बे येथे एफसी इस्तिकोल विरूद्धच्या सामन्यात एफसी गोवाला 2-0 असा सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला. सलग दोन पराभवांनंतर एफसी गोवा आता आशियातील हाय-प्रोफाईल क्लबपैकी त्यांच्या सर्वांत कठीण मोहिमेला सामोरे जात आहेत.
मार्केझ पुन्हा एकदा त्याचा अनुभवी खेळाडू डेव्हिड तिमोरवर अवलंबवून राहण्याची अपेक्षा आहे जो मीडफिल्डमध्ये नियंत्रण प्रदान करेल. मोरेनोवर बॅकलाईन तसेच झावी सिव्हेरियो, डेझान डॅझिक आणि उदांता सिंग यांच्या खेळावर एफसी गोवाला जास्त निर्भर राहावे लागेल. एफसी गोवाचे लक्ष कॉम्पॅक्ट डिफेन्सिव्ह ऑर्गनायझेशन, ब्रेकवर जलद आउटलेट आणि सेट-पीस परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यावर असेल. एफसी गोवाला तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ प्रतिस्पर्ध्याला रोखायचे असेल आणि त्यांचा सामना करायचा असेल तर या गोष्टी महत्वाच्या असतील.
पाहुण्या अल-नासरने पोर्तुगाली प्रशिक्षक जॉर्ज जीझसच्या प्रशिक्षणाखाली एसीएल 2 मोहिमेची सुरूवात धडाकेबाज पद्धतीने केली आहे. सौदीच्या क्लबने सुरूवात आकर्षक पद्धतीने करताना एफसी इस्तिकोलवर 5-0 असा विजय मिळवून केली व त्यानंतर अल-झावरा एफसीवर 2-0 असा विजय मिळविला.
अल-नासर एफसीच्या सेटअपच्या केंद्रस्थानी अँजेलो गॅब्रियल आहे. त्यानंतर सॅडिओ माने, जुवांव फेलिक्स तसेच इनिगो मार्टिनेझ यासारखे अव्वल दर्जाचे खेळाडू या संघात आहेत. अल-नासरसाठी हा सामना वर्चस्व राखण्यासाठी आणि गुणतक्त्यात आपला आलेख वाढविण्यासाठी आहे. एफसी गोवासाठी, हा सामना लवचिकता, अभिमान आणि आशियातील सर्वोत्तम संघाशी स्पर्धा करू शकतो यासाठी असेल. सध्या स्पर्धेच्या दोन फेऱ्यानंतर अल-नासरचे 6, अल-झावरा एफसीचे 3, एफसी इस्तिकोलचे 3 तर सलग दोन पराभवांनी एफसी गोवाचा गुणफलक कोराच आहे.









