कोणत्याही हल्ल्याला संयुक्तपणे प्रत्युत्तर देण्याची तयारी
वृत्तसंस्था/रियाध
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत एका देशावरील हल्ला हा दुसऱ्या देशावरील हल्ला मानला जाईल. सौदी प्रेस एजन्सीनुसार, हा करार सुरक्षा वाढवण्यासाठी आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांची वचनबद्धता दर्शवितो. दोन्ही देशांमध्ये एक संरक्षण महामंडळ देखील विकसित केले जाईल, असे दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील करारात लष्करी सहकार्याचा समावेश असून त्यामध्ये आवश्यक असल्यास पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा वापर समाविष्ट असणार आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील संरक्षण कराराबद्दल भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली असून भारत सरकारला या कराराविषयी आधीच माहिती होती अशी टिप्पणी केली आहे.
द्विपक्षीय करारासाठी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख असीम मुनीर, उपपंतप्रधान इशाक दार, संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ, अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब आणि एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सौदी अरेबियात पोहोचले होते. संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली तेव्हा पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर देखील उपस्थित होते. हा करार कोणत्याही विशिष्ट देशाविरुद्ध किंवा घटनेविरुद्ध नाही, तर दोन्ही देशांमधील दीर्घकालीन आणि दृढ सहकार्याचे अधिकृत प्रकटीकरण असल्याचे सांगण्यात आले.
नाटोसारख्या सैन्य निर्मितीचा सल्ला
9 सप्टेंबर रोजी इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे हमास प्रमुख खलील अल-हय्या यांच्यावर हल्ला केला. अल-हय्या हल्ल्यातून बचावले, परंतु इतर सहा जण ठार झाले. त्यानंतर, 14 सप्टेंबर रोजी, मुस्लीम देशांचे अनेक नेते इस्रायलविरुद्ध विशेष बैठकीसाठी दोहा येथे जमले. पाकिस्तानने सर्व इस्लामिक देशांनी नाटोसारखी संयुक्त सैन्य तयार करावी असे सुचवले. पाकिस्तानचे उपपंतप्रधान मोहम्मद इशाक दार यांनी संयुक्त संरक्षण दल स्थापन करण्याच्या शक्यतेचा उल्लेख करताना अणुशक्ती असलेला पाकिस्तान इस्लामिक समुदायाप्रती आपली जबाबदारी पार पाडेल, असे स्पष्ट केले आहे.
यापूर्वी अमेरिकेशीही करार, पण…
पाकिस्तानचा यापूर्वी अमेरिकेसोबत सौदी अरेबियासारखाच संरक्षण करार होता. हा करार 1979 मध्ये मोडला गेला. त्याआधी भारत आणि पाकिस्तानने दोन युद्धे लढली होती, परंतु अमेरिकेने दोन्ही युद्धांमध्ये थेट मदत केली नव्हती. जुना पाकिस्तान-अमेरिका संरक्षण करार 1950 च्या दशकातील होता. तेव्हा अमेरिकेने सोव्हिएत युनियनच्या विस्ताराला तोंड देण्यासाठी दक्षिण आशियातील मित्रराष्ट्रांचा शोध घेतला होता. या काळात पाकिस्तानने अमेरिकेसोबत लष्करी युती केली होती.









