पंतप्रधान मोदींची युवराज सलमान यांच्याशी चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहिलेले सौदी अरेबियाचे युवराज सलमान परिषद संपल्यानंतरही भारतात थांबले असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली आहे. दिल्लीतील हैदराबाद हाऊस या अतिथीगृहात ही चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक आणि संरक्षणविषयक तसेच आर्थिक मुद्द्यांवर काही करार होण्याची शक्यता व्यक्त होत असून या करारांची पूर्वतयारी या चर्चेत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही नेत्यांची चर्चा साधारणत: दीड तास चालली होती, अशीही माहिती नंतर देण्यात आली आहे.
भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागिदारी मंडळाची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली होती. संरक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्यासंबंधीच्या धोरणांचा पाया तयार करण्यासाठी हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युवराज सलमान यांच्यातील सोमवारच्या चर्चेनंतर दोन्ही देशांमधील परस्पर संबंध अधिक पुढच्या पातळीवर पोहचले आहेत, अशी माहिती दोन्ही देशांच्या विशेष अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सलमान यांचा भारत दौरा
जी-20 शिखर परिषदेला जोडूनच युवराज सलमान यांचा भारत दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे ते भारताच थांबले आहेत. जी-20 परिषदेचे उत्कृष्ट आयोजन भारताने करुन दाखविले आहे. त्यामुळे सौदी अरेबियासह सर्व सदस्य देश समाधानी आहेत. भारताच्या दौऱ्यावर आल्याचा आपल्याला विशेष आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया चर्चेनंतर सलमान यांनी व्यक्त केली.
शानदार स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेआधी युवराज सलमान यांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्य स्वागत करण्यात आले. जी-20 परिषदेत ज्या घोषणा करण्यात आल्या आणि जी धोरणे विविध मुद्द्यांवर ठरविण्यात आली, त्यांना आमचा देश समर्थन देत आहे. या घोषणांचा आणि धोरणांचा जगाला लाभ होईल. भारत हा सौदी अरेबियाचा मित्रदेश असून दोन्ही देश परस्परांच्या प्रगतीला पूरक ठरतील आणि दोन्ही देशांमधील सहकार्य नेहमी वृद्धिंगत होत राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सामरिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताशी सहकार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सामरिक सहकार्याच्या हालचाली
2020 मध्ये भारताचे तत्कालीन भूसेना प्रमुख एम. एम. नरवणे यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. त्या देशाचा दौरा करणारे ते प्रथम भारतीय सेनाधिकारी ठरले होते. त्यानंतरच्या 3 वर्षांमध्ये दोन्ही देशांच्या सेना उच्चाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या देशांचे अनेक दौरे केले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सामरिक सहकार्याच्या हालचाली होत असल्याचे बोलले जात आहे.









