वृत्तसंस्था/ गॅले
सौद शकीलच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी पाकने लंकेविरुद्धच्या पहिल्या डावात 461 धावांचा डोंगर उभा केला. पाकने लंकेवर पहिल्या डावात 149 धावांची भक्कम आघाडी मिळवली असून दिवसअखेर लंकेने दुसऱ्या डावात बिनबाद 14 धावा जमवल्या.

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत लंकेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 95.2 षटकात 312 धावा जमवल्या होत्या. लंकेच्या पहिल्या डावात धनंजय डिसिल्वाने दमदार शतक तर अँजेलो मॅथ्यूज अर्धशतक झळकवले होते. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी, नसीम शहा आणि अब्रार अहमद यांची गोलंदाजी प्रभावी झाली. त्यानंतर पाकने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरुवात केली पण लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांची एकवेळ स्थिती 5 बाद 101 अशी केविलवाणी झाली होती. शकील अहमद आणि आगा सलमान या जोडीने संघाचा डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी 177 धावांची शतकी भागीदारी केली. पाकने 5 बाद 221 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित पाच गडी 240 धावांची भर घालत तंबूत परतले. 69 धावावर नाबाद राहिलेल्या सौद शकीलने नाबाद द्विशतक झळकवले. त्याने 361 चेंडूत 19 चौकारांच्या मदतीने 208 धावांचे योगदान दिले. आगा सलमान रमेश मेंडिसच्या गोलंदाजीवर समरविक्रमाकरवी यष्टीचित झाला. त्याने 113 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 83 धावा जमवल्या. सलमान बाद झाल्यानंतर नौमन अलीने शकीलला बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने सातव्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली. रमेश मेंडिसने नौमन अलीला पायचित केले. त्याने 4 चौकारांसह 25 धावा जमवल्या. उपाहारावेळी पाकची स्थिती 6 बाद 313 अशी होती. शकीलने आपले शतक 9 चौकारांच्या मदतीने 129 चेंडूत झळकवले.
उपाहारानंतर लंकेने दुसरा नवा चेंडू घेतला. खेळाच्या दुसऱ्या सत्रात पाकने दोन गडी गमवले. शकीलने 14 चौकारांच्या मदतीने 222 चेंडूत आपले दीडशतक पूर्ण केले तर त्याने नसीम शहासमवेत नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. चहापानावेळी पाकने 8 बाद 389 धावा जमवल्या होत्या. खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाला आणि पाकच्या 400 धावा फलकावर लागल्या. शकीलने या कालावधीत आपले द्विशतक 352 चेंडूत 19 चौकारांच्या मदतीने झळकवले. त्याने नसीम शहासमवेत 9 गड्यासाठी 94 धावांची भागीदारी केली. पाकचा पहिला डाव 121.2 षटकात 461 धावावर आटोपला. लंकेतर्फे रमेश मेंडिसने 136 धावात 5 तर प्रभात जयसुर्याने 3, व्ही. फर्नांडो आणि रजिता यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी लंकेने दुसऱ्या डावात बिनबाद 14 धावा जमवल्या होत्या. मधुष्का 8 तर कर्णधार करुणारत्ने 6 धावावर खेळत होते. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून लंकन संघ अद्याप 135 धावांनी पिछाडीवर आहेत. या कसोटीत लंकेच्या तुलनेत पाकचे पारडे निश्चितच जड वाटते.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 95.2 षटकात सर्वबाद 312, पाक प. डाव 121.2 षटकात सर्वबाद 461 (सौद शकील नाबाद 208, आगा सलमान 83, शफीक 19, शान मसूद 39, बाबर आझम 13, सर्फराज अहमद 17, नौमन अली 25, अब्रार अहमद 10, शाहीन आफ्रिदी 9, नसीम शहा 6, अवांतर 31, रमेश मेंडिस 5-136, जयसुर्या 3-145, व्ही. फर्नांडो 1-69, रजिता 1-77).









