विवाह ठरवताना दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ लोक मुलामुलींच्या आयुष्याचा विचार करत.
By : बाळासाहेब उबाळे
कोल्हापूर : काळाच्या ओघात आदर्श विवाह पद्धती मागे पडून डामडौल, झगमगाटावर अनावश्यक खर्च होत असल्याचे चित्र आहे. श्रीमंतांकडून भले विवाहाचे प्रदर्शन केले जात असेल, पण मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबाकडूनही त्याचे अनुकरण होत आहे.
डामडौलाच्या विवाह सोहळ्यामुळे दोन्ही कुटुंबे कर्जबाजारी होऊन पुढे त्यांचे आयुष्य कर्ज फेडण्यात जाते. अशावेळी. समतेच्या दिशेने घेऊन जाणारी सत्यशोधक विवाह पद्धती अनुसरण्याची गरज आहे. अगदी 1990 पर्यंत विवाह ठरवताना दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ लोक मुलामुलींच्या आयुष्याचा विचार करत.
विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडत होते. लग्नातील ताटात मोजकेच महाराष्ट्रीयन पदार्थ असत. लग्नात कापडी मंडप उभारला जात होता. आता काळाच्या ओघात लग्नाचा ट्रेंडच बदलून गेला आहे. या विवाह सोहळा इव्हेंट झाला आहे. मुला–मुलींनी फक्त बोहल्यावर जाऊन उभे रहायचे, बाकी सर्व काम इव्हेंटचे लोक पहात आहेत.
पूर्वी लग्नातच एकेमकांचे तोंड पाहणारे वधुवर आता प्री–वेडिंगच्या नावाखाली काही दिवस एकत्र घालवत आहेत. प्री–वेडिंगची चित्रफीत लग्नसोहळ्यात स्क्रिनवर दाखवली जात असल्यामुळे मुख्य विवाह सोहळा बाजूला पडत आहे. येणाऱ्या पाहुण्यांचा एकमेकांशी संवाद हरवला आहे. हळदीपासून ते वरातीपर्यंत ‘डीजे’वर धिंगाणा घातला जात आहे.
संपूर्ण विवाह सोहळा झाल्यानंतर मात्र नवदाम्प्त्याची आणि त्या दोन्ही कुटुंबांची फरफट सुरु होते. कर्ज काढून विवाह केला असल्यास कर्ज फेडण्यात त्यांची वर्षे जातात. त्यामुळे दोन कुटुंबात खटके उडायला लागतात आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. त्यामुळे सद्यस्थितीत सत्यशोधक विवाह पध्दत आदर्श ठरत आहे.
सत्यशोधक विवाह पद्धती वैशिष्ट्ये
या पद्धतीत धार्मिक विधी किंवा पुरोहित नसतो. वधू–वर एकमेकांना समान मानून विवाहबध्द होतात. हुंडा देणे–घेणे याला या विवाह पद्धतीत विरोध आहे. सोहळयात महात्मा फुलेंनी निर्मिलेल्या समतेच्या मंगलाष्टकांचे पठण केले जाते. सत्यशोधक विवाह पध्दती, सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे.
सत्यशोधक विवाहाचा अर्थ
सत्यशोधक विवाह पद्धत म्हणजे कोणत्याही धार्मिक, सामाजिक रुढी–परंपरांना न जुमानता केवळ प्रेम, समजूतदारपणा आणि समानतेवर आधारित विवाह आहे. यात वधू–वर एकमेकांना समान मानून आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात.
काय आहे सत्यशोधक विवाह?
सत्यशोधक विवाह ही सामाजिक, समतावादी विवाह पद्धती आहे. वधूवर एकमेकांना समतेच्या भावनेने स्वीकारतात. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यांच्या सुधारणा तत्वातील सत्यशोधक विवाह पध्दती ही त्यापैकी एक आहे.
जोडीदाराची विवेकी निवड उपक्रम
“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना यासाठी ‘जोडीदाराची विवेकी निवड’सारखे उपक्रम राबवून लग्नाळू मुलेमुली आणि त्यांच्या पालकांना सत्यशोधक विवाहासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, मदत करण्याचे काम करतात. सध्याच्या परिस्थितीत सर्वांनीच विवाहात होणारा अनावश्यक खर्च टाळून तो नवदाम्प्त्याच्या पुढील आयुष्यासाठी ठेवण्याची गरज आहे.”
– कृष्णात स्वाती, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती








