अटकेची चर्चा, मात्र पोलिसांकडून इन्कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शनिवारी येथील एका पोलीस ठाण्यात हजेरी लावल्याने त्यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पोलिसांनी याबाबत खुलासा केल्यानंतर त्यांना अटक झाली नसल्याचे स्पष्ट झाले. आम्ही त्यांना ताब्यात घेतले नाही किंवा सोडले नाही. ते स्वत: येथे आले होते आणि आता निघूनही गेले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील काही खाप आणि शेतकरी नेते मलिक यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटायला आले होते. या नेत्यांसाठी मलिक घराजवळील आरके पुरमच्या उद्यानात तंबू ठोकून जेवण बनवत होते. त्यानंतर दिल्ली पोलीस अधिकारी तेथे पोहोचले व कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. आपण कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मागितली तेव्हा पोलिसांनी ती नाकारली होती, असे मलिक म्हणाले. त्यामुळेच कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने ते थेट अटक होण्यासाठी भेटायला आलेल्या नेत्यांसोबत पोलीस स्थानकात पोहोचले. दिल्ली पोलिसांनी मात्र अटकेचा इन्कार केला आहे. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नसल्यामुळे बराच गोंधळ सुरू होता.









