सात्विकचा ‘स्मॅश’ गीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
वृत्तसंस्था/ येवसू, कोरिया
भारताची बॅडमिंटनमधील स्टार दुहेरीची जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी येथे सुरू असलेल्या कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या सात्विक-चिराग शेट्टी यांनी थायलंडच्या सुपाक जोमकोह व कित्तिनुपाँग केद्रेन यांच्यावर 21-16, 21-14 अशी मात केली. दुसऱ्या फेरीत त्यांची लढत चीनच्या हे जि टिंग व झोयू हाओ डाँग यांच्याशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत 27 व्या स्थानावर असणाऱ्या एमआर अर्जुन व ध्रुव कपिला यांना मात्र पहिल्या फेरीचा सामना पूर्ण करता आला नाही. अर्जुनला पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने पहिला गेम अर्ध्यावरच सोडून देत माघार घ्यावी लागली. यावेळी ते 5-6 असे पिछाडीवर होते. त्यांनी माघार घेतल्याने आठव्या मानांकित चीनच्या लियू यू चेन व ओयू झुआन यि यांना दुसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाली.
‘रॅलीज खेळताना माझ्या पाठीत वेदना होऊ लागल्या. त्यावर मी वेदनाशामक स्प्रे देखील मारून घेतला. तरीही वेदना कमी न झाल्याने आम्ही माघार घेण्याचा निर्णय घेतला. पाठ जखडली असावी, असे फिजिओने सांगितले असून काही दिवसात बरे वाटेल, असे त्यांनी सांगितले. मी जपानला जाणार असून तोपर्यंत मी पूर्ण बरा होईन, अशी मला आशा वाटते,’ असे अर्जुनने सांगितले.
भारताच्या हर्षित अगरवाललाही मुख्य स्पर्धेत स्थान मिळविता आले नाही. पात्रता फेरीच्या दुसऱ्या लढतीत त्याला कोरियाच्या चोई प्याँग गांग याच्याकडून 15-21, 21-10, 10-21 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी पहिल्या सामन्यात त्याने मलेशियाच्या टॅन जिया जी याला हरविले होते. आणखी एक भारतीय खेळाडू शाश्वत दलाल मुख्य स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाला. कोरियाच्या जेआँग मिन सेऑन याने त्याला 21-14, 21-17 असे हरवित दुसरी फेरी गाठली. याशिवाय मीराबा मेस्नमने पात्रता फेरीतूनच माघार घेतली.
गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळविल्यानंतर पहिल्याच स्पर्धेत खेळणाऱ्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी तोच जोम येथेही कायम ठेवत प्रतिस्पर्धी जोडीवर 4-1 अशी आघाडी घेतली आणि ब्रेकपर्यंत ती 11-6 अशी वाढवली. भारतीय जोडीने त्यांना वरचढ ठरण्याची फारशी संधीच दिली नाहे आणि 18-15 नंतर उर्वरित गुण घेत हा गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये थायलंडच्या जोडीने चांगली टक्कर देत 9-4 अशी बढत घेतली. पण लवकरच सात्विकसाईराज-चिराग यांनी नियंत्रण मिळविले आणि 15-11 अशी झेप घेतल्यानंतर आघाडी कायम राखत त्यांने विजय साकार केला.
सात्विक गीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये : सर्वात वेगवान स्मॅशची नोंद
सात्विकसाईराजने नवा गीनिज विश्वविक्रम नोंदवताना पुरुष खेळाडूने मारलेल्या सर्वात वेगवान स्मॅश नोंदवला. त्याने मारलेला स्मॅश 565 किमी प्रति तास इतका वेगवान होता. हा नवा विक्रम नोंदवताना मे 2013 मध्ये मलेशियाच्या टॅन बून हेआँगने नोंदवलेला 493 किमी प्रति तास वेगाचा विक्रम त्याने मागे टाकला. सात्विकचा हा स्मॅशचा आश्चर्यकारक वेग फॉर्मुला वन कारच्या वेगापेक्षाही (372.6 किमी प्रति तास) खूपच वेगवान ठरला. महिलांमध्ये हा विश्वविक्रम मलेशियाच्या टॅन पियर्लीने नोंदवला आहे. तिने 438 किमी प्रति तास गतीने सर्वात वेगवान फटका मारला आहे. हे वर्ल्ड रेकॉर्ड 14 एप्रिल 2023 मध्ये नोंदवण्यात आले असून गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत जजेसच्या निरीक्षणाखाली त्याची नोंद करण्यात आली. जपानमधील सोका, सायतामा येथील योनेक्स फॅक्टरी जिम्नॅशियममध्ये नियंत्रित वातावरणात सात्विकच्या स्मॅशचा वेग नोंदवण्यात आला होता.









