सुपर-1000 वर्ल्ड टूर स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी,
अंतिम लढतीत मलेशियाच्या वर्ल्ड चॅम्पियन जोडीवर मात
वृत्तसंस्था/ जकार्ता
भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिरागने अंतिम सामन्यात मलेशियाच्या वर्ल्ड चॅम्पियन आरोन चिया आणि सोह वुई यिकला नमवण्याची किमया साधली. या जोडीचा 21-17, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. मलेशियाच्या या चॅम्पियन जोडीविरुद्ध 7 वेळा पराभूत झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी पहिला विजय मिळवला आहे. आरोन चिया आणि सोह वुई यिक यांची जोडी पुरुष डबल्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे.
दरम्यान, जागतिक बॅडमिंटनमध्ये सुपर 1000 ही स्पर्धा मानाची समजली जाते. या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम व सर्वाधिक मानांकन गुण असतात. जागतिक स्तरावर मलेशिया ओपन, इंडोनेशिया ओपन, चायना ओपन व ऑल इंग्लंड ओपन या चार स्पर्धा सुपर 1000 सीरिजच्या आहेत. सात्विक आणि चिराग जोडीचे हे पहिले सुपर 1000 वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय जोडीने 1000 वर्ल्ड टूर स्पर्धा जिंकलेली नाही. विशेष म्हणजे, सात्विक आणि चिराग या जोडीने याआधी सुपर 100, सुपर 300, सुपर 500 आणि सुपर 750 या जेतेपदावर नाव कोरले. असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे.
सरळ गेम्समध्ये विजय
इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा ही जगतातील मानाची स्पर्धा मानली जाते. यामध्ये अनेक आघाडीचे खेळाडू भाग घेत असतात. यामध्ये भारताच्या जोडीने जेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी साकारली. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सात्विक-चिराग भारतीय जोडीने सुरुवातीपासून आक्रमक खेळताना सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रारंभी, मलेशियन जोडीने सामन्याची दमदार सुरुवात केली. त्यांच्याकडे 0-3 अशी आघाडी होती, त्यानंतर स्कोअर 3-7 असा झाला. काही क्षणातच भारतीय जोडीने शानदार पुनरागमन करत 11-9 अशी आघाडी घेतली. यादरम्यान सात्विक आणि चिरागने सलग 6 गुण मिळवले. यानंतरही खेळ बराच काळ सुरुच होता. शेवटी, भारतीय जोडीने पहिला गेम 18 मिनिटांत 21-17 असा जिंकला.
दुसरा गेम मात्र चांगलाच चुरशीचा झाला. 25 मिनिटे चाललेल्या या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये चुरस पहायला मिळाली. एका टप्प्यावर सामना 5-5 असा बरोबरीत होता. मात्र त्यानंतर भारतीय जोडीने आघाडी घेण्यास सुरुवात केली. दुस्रया हाफच्या ब्रेकपर्यंत भारतीय जोडीकडे 11-8 अशी आघाडी होती. यानंतर सात्विक आणि चिरागने आपला खेळ उंचावला. त्यांची आघाडी 20-14 अशी वाढली होती. पण यानंतर सात्विक आणि चिरागकडून चुका होऊ लागल्या. मलेशियाच्या जोडीने सलग 4 गुण मिळवले. मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय जोडीने खेळ उंचावत 21-18 असा गेम जिंकून जेतेपदावर नाव कोरले.
स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जोडी अजिंक्य
जागतिक स्तरावर इंडोनेशिया ओपन स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते. या स्पर्धेला 1982 मध्ये सुरुवात झाली. आजपर्यंत या स्पर्धेवर मलेशिया, चीन, जपान, इंडोनेशिया या देशातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. पण, स्पर्धेच्या 41 वर्षाच्या इतिहासात प्रथमच पुरुष दुहेरीत भारतीय जोडीने ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. यापूर्वी, कोणत्याही भारतीय जोडीला या स्पर्धेत यश मिळवता आलेले नाही.
सुपर टायटल जिंकणारी पहिली भारतीय जोडी
भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात पुरुष दुहेरीत अपेक्षित यश आजपर्यंत कोणालाही मिळवता आलेले नाही. अलीकडील काही वर्षात मात्र सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी मात्र मलेशियन, चिनी व जापनीज खेळाडूंना टक्कर देत पुरुष दुहेरीत शानदार यश मिळवले आहे. याच जोरावर भारतीय जोडीने सुपर 100, सुपर 300, सुपर 500 आणि सुपर 750 या जेतेपदे पटकावली आहेत. आता, यंदाच्या वर्षात इंडोनेशियन ओपन सुपर 1000 स्पर्धा जिंकत बॅडमिंटनमध्ये सर्व सुपर टायटल स्पर्धा जिंकण्याचा मान पटकावला आहे.
प्रतिक्रिया
इंडोनेशियन ओपन स्पर्धेतील जेतेपद हे अविस्मरणीय आहे. उपांत्य व अंतिम फेरीत दिग्गज खेळाडूंविरुद्ध चांगलाच कस लागला. पण, इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवता आले.
सात्विकसाईराज व चिराग शेट्टी, भारतीय बॅडमिंटनपटू.
जेतेपदानंतर अभिनंदनाचा वर्षाव
इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद जिंकल्यानंतर सात्विक व चिराग या जोडीचे भारतीय बॅडमिंटन महासंघाने विशेष अभिनंदन केले आहे. मलेशियन वर्ल्ड चॅम्पियन जोडीला पराभूत करत भारताने इतिहास रचला आहे, असे ट्विट महासंघाने केले आहे. याशिवाय, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलियन यांच्यासह अनेक मान्यवरांनी ट्विट करत सात्विक व चिराग यांचे अभिनंदन केले आहे.
दृष्टीक्षेपात साक-चिराग
- सात्विक-चिरागचे हे कारकिर्दीतील सहावे जेतेपद. गतवर्षी इंडिया ओपन, फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्या, तर 2019 मध्ये या जोडीने थायलंड ओपन आणि 2018 मध्ये हैदराबाद ओपन स्पर्धा जिंकली होती.
- सात्विक-चिराग यांनी 2022 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
- 2023 मध्ये सात्विक-चिरागने प्रथमच स्विस ओपन स्पर्धा जिंकली. यानंतर इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकत कारकिर्दीतील सहावे जेतेपद पटकावले.
- यंदाच्या वर्षी बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकण्याची कामगिरी.
अॅक्सेलसेन, चेन युफेई अजिंक्य
या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेनने थायलंडच्या गिंटीगला 21-14, 21-13 असे नमवत जेतेपद पटकावले. तसेच महिला एकेरीत स्पेनची अव्वल खेळाडू कॅरोलिन मारिनला उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत चीनच्या चेन युफेईने मारिनला 21-18, 21-19 असे पराभूत केले.









