इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : एचएस प्रणॉय उपांत्य फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/ जकार्ता
येथे सुरु असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी अंतिम फेरी गाठली आहे. या जोडीने दक्षिण कोरियाच्या मिन ह्यूक-सेऊंग जोडीचा 17-21, 21-19, 21-18 असा पराभव केला. अन्य एका लढतीत पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असलेल्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी जोडीने उपांत्य फेरीत शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये शानदार सुरुवात केली पण त्यांना हा गेम 18-21 असा गमवावा लागला. पहिला गेम गमावल्यानंतर मात्र भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. सुरुवातीपासून आक्रमक खेळताना भारतीय जोडीने हा गेम 21-19 असा जिंकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर तिसरा व निर्णायक गेमही चांगलाच चुरशीचा झाला. या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये एक एक गुणासाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. एकवेळ सात्विकसाईराज-चिराग व मिन ह्याक-सेऊंग यांच्यात 18-18 अशी बरोबरी होती. पण मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत भारतीय जोडीने हा गेम 21-18 असा जिंकत हा सामना आपल्या नावे केला व अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. आता, त्यांची विजेतेपदासाठी लढत मलेशिया व इंडोनेशिया यांच्यातील विजेत्यांशी होईल.
प्रणॉय उपांत्य फेरीत पराभूत
पुरुष एकेरीत भारताचे एकमेव आशास्थान असलेल्या एचएस प्रणॉयला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसेनने 21-15, 21-15 असे सहजरित्या पराभूत केले. या लढतीत प्रणॉयकडून अनेक चुका झाल्या, याचा फायदा व्हिक्टरने घेत अंतिम फेरी गाठली.
याशिवाय, महिला एकेरीत स्पेनची दिग्गज खेळाडू कॅरोलिन मारिन व चीनची चेन युफेई यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.









