वृत्तसंस्था/ पॅरीस
येथे सुरु असलेल्या 2022 च्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या प्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली.
या स्पर्धेत झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताची दहावी मानांकित जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी जपानच्या माजी विश्व विजेत्या टॉप सिडेड तेकुरो होकी आणि युगो कोबायेशी यांचा 23-21, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये 49 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आता या स्पर्धेत दक्षिण कोरियाची गेयु आणि किम हो यांची उपांत्य फेरीची लढत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांच्याशी होणार आहे. 2022 साली झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी सुवर्णपदक पटकावले होते.
या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचे आव्हान दुसऱया फेरीतच डेन्मार्कच्या रेसमूस गिमेकीने संपुष्टात आणले. 75 मिनिटे चाललेल्या या सामन्यात रेसमूसने के. श्रीकांतचा 19-21, 21-12, 21-19 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात भारताच्या समीर वर्माला थायलंडच्या व्ही. कुणालवेतने 21-18, 21-11 तसेच चीनच्या लु ग्युयांगने भारताच्या एच. एस. प्रणॉयचा 21-19, 20-22, 21-19 असा पराभव केला.









