नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2022 बॅडमिंटन हंगामाअखेरीस पुरुष दुहेरीच्या मानांकनात भारताची जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचप्रमाणे पुरुष एकेरीच्या मानांकन यादीत भारताच्या लक्ष्य सेनने सातवे तसेच किदांबी श्रीकांतने 11 वे स्थान मिळवले आहे पण एच. एस. प्रणॉयची विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2022 सालातील सर्वोत्तम पुरुष बॅडमिंटनपटूसाठी शिफारस करण्यात आली आहे.
भारतीय बॅडमिंटन संघाने या वर्षाच्या बॅडमिंटन हंगामात दर्जेदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने बँकॉकमध्ये थॉमस चषक पहिल्यांदाच जिंकून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. लक्ष्य सेनने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. महिलांच्या एकेरीच्या मानांकन यादीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने सहावे स्थान तर महिला दुहेरीच्या मानांकन यादीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रीसा जॉली यांनी 18 वे स्थान त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीच्या मानांकन यादीत भारताच्या इशान भटनागर आणि तनीषा क्रॅस्टो यांनी 21 वे स्थान मिळवले आहे.









