अंतिम लढतीत तैवानच्या ली हुएई-यांग पो हुआनचा केला पराभव
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताच्या सात्विकसाईराज रंकिरे•ाr आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले. पॅरिसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी रविवारी तैवानच्या ली हुएइ आणि यांग पो हुआन या जोडीला पराभूत केले. विशेष म्हणजे, फ्रेंच ओपन स्पर्धेतील भारतीय जोडीचे हे दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती. तसेच यंदाच्या हंगामातील भारतीय जोडीचे हे पहिलेच जेतेपद आहे.
सात्विक आणि चिराग यांनी या संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. रविवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी तैवानच्या ली हुएइ आणि यांग पो हुआन या जोडीचा 21-11, 21-17 असा सरळ गेममध्ये पराभव केला. 37 मिनिटे चाललेल्या या फायनलमध्ये भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम अवघ्या 15 मिनिटांत 21-11 असा जिंकला. मात्र दुस्रया गेममध्ये या दोघांना थोडाफार संघर्ष करावा लागला. तैवानच्या जोडीने दुसऱ्या गेममध्ये दमदार कामगिरी केली. त्यांनी एका क्षणी 11-10 अशी आघाडी घेतली होती. परंतु सात्विक आणि चिरागने अजिबात हार न मानता जबरदस्त पुनरागमन करत गेम 21-17 असा जिंकत जेतेपदाला गवसणी घातली.
सात्विक आणि चिराग यांनी या हंगामाच्या सुरुवातीला मलेशिया ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत त्यांना अपयश आले होते. यानंतर इंडिया ओपनच्या अंतिम फेरीतही त्यांच्या हाती निराशा आली. फ्रेंच ओपनमध्ये मात्र भारतीय जोडीने धमाकेदार खेळ साकारत जेतेपद खेचून आणले, हे विशेष.









