सिंगापूर ओपन बॅडमिंटन : मलेशियन जोडीकडून पराभव
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताच्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांची सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी घोडदौड उपांत्य फेरीत रोखली गेली. तीन गेम्सच्या अटीतटीच्या लढतीत त्यांना मलेशियाच्या अॅरोन चिया व सोह वूइ यिक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
माजी जागतिक अग्रमानांकित असलेल्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी पहिला गेम जिंकून आघाडी घेतली होती. पण ही आघाडी त्यांना नंतर टिकविता आली नाही आणि त्यांना मलेशियन जोडीकडून 21-19, 10-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला. 64 मिनिटे ही लढत रंगली होती. मलेशियन जोडीने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय जोडी सध्या जागतिक क्रमवारी 27 व्या स्थानावर आहे. आरोग्य आणि फिटनेसच्या समस्येमुळे त्यांना झगडावे लागले असल्याने क्रमवारीत त्यांची बरीच घसरण झाली आहे.
पहिला गेम जिंकून त्यांनी आपला दर्जा दाखवून दिला. पण दुसऱ्या गेममध्ये त्यांना झगडावे लागले आणि मोठी आघाडी दिल्यानंतर त्यातून त्यांना सावरता आले नाही. या वर्षात तिसऱ्यांदा त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. इंडिया ओपन व मलेशिया ओपनमध्येही त्यांनी शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले होते. पराभव झाला असला तरी त्यांनी जिगरबाज खेळ केला. लढतीत उतरण्याआधी मलेशियन जोडीविरुद्ध त्यांचे 3-9 असे रेकॉर्ड होते. त्यांनी सलग तीनदा मलेशियन जोडीला हरविले होते. त्यात आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य लढत व इंडोनेशिया ओपनमधील अंतिम लढतीचा समावेश आहे. मात्र ऑलिम्पिक उपांत्यपूर्व फेरीत त्यांना मलेशियन जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता.









