वृत्तसंस्था/ ओडेन्स (डेन्मार्क)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या सुपर 750 पुरुष आणि महिला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांचे दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. जपानच्या ताकूरो होकी आणि युगो कोबायाशी यांनी सात्विक आणि चिराग यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
2025 च्या बॅडमिंटन हंगामात अलिकडच्या कालावधीत झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीला जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन सात्विक आणि चिराग यांनी अलिकडेच हाँगकाँग सुपर 500 तसेच चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धामध्ये सलग अंतिम फेरी गाठली होती.
शनिवारी उशिरा झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या होकी आणि कोबायाशी यांनी सात्विक आणि चिराग यांचा 23-21, 18-21, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 68 मिनिटे चालला होता. 950,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील सात्विक आणि चिराग यांच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. तत्पूर्वी एकेरीच्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनला पराभव पत्करावा लागला होता.









