वृत्तसंस्था/ शेनझेन (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या चायना मास्टर्स 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले.
कोरिया प्रजासत्ताकच्या सिओ सेयुंग जेई आणि जीन याँग या जोडीने भारताची नववी मानांकित जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा 21-18, 14-21, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य फेरीचा सामना 75 मिनिटे चालला होता. या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोरियाच्या जेई आणि याँग यांनी पहिला गेम 21-18 असा जिंकल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी आपल्या अचूक स्मॅश फटक्यावर दुसरा गेम 21-14 असा जिंकून बरोबरी साधली. पण तिसऱ्या गेममध्ये कोरियाच्या जोडीने दर्जेदार खेळ करत भारतीय जोडीचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत डेन्मार्कच्या अॅस्ट्रूप आणि रेसमुसेन यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. तर पहिल्या फेरीतील सामन्यात त्यांनी चीन तैपेईच्या हुएई आणि हेसून यांचा पराभव केला होता. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या अँटोनसेनने भारताच्या लक्ष्य सेनचा पराभव केला. तर महिलांच्या विभागात भारताच्या पीव्ही. सिंधूचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात संपुष्टात आले.









