वृत्तसंस्था /सिंगापूर
येथील सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरूष दुहेरीची जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी विजयी पुनरागमन केले तर लक्ष्य सेनला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले.
मार्चमध्ये चिरागला पाठदुखीमुळे ऑल इंग्लंड ओपनमधून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर पहिल्यांदाच कोर्टवर परतलेल्या या खेळाडूने सात्विकसमवेत मलेशियाच्या चुंग होन जियान आणि मुहम्मद हैकल यांना 40 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 21-16, 21-13 असे पराभूत केले. 41 व्या क्रमांकाच्या मलेशियन जोडीवर सात्विक आणि चिरागचा हा दुसरा विजय होता. या जोडीने या महिन्याच्या सुरुवातीला सुदिरमन कपमध्ये भाग घेतला नव्हता. कारण सात्विकला आरोग्याची समस्या भेडसावत होती. त्याआधी त्यांनी या हंगामात मलेशिया ओपन आणि इंडिया ओपन दोन्हीमध्ये उपांत्य फेरी गाठली होती.
भारताचा पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला चिनी तैपेईच्या लीन चुन यी विरुद्ध पहिल्याच फेरीच्या सामन्यात दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले. जागतिक क्रमवारीत 17 व्या क्रमांकावर असलेल्या सेनने जोरदार सुरुवात केली आणि पहिला गेम 21-15 असा जिंकला होता. परंतु त्याचा प्रतिस्पर्धी जागतिक 19 व्या क्रमांकावर असलेल्या लिनने पुनरागमन करत दुसरा गेम 21-17 असा जिंकला. निर्णायक गेममध्ये जेव्हा सेन 5-13 ने पिछाडीवर होता तेव्हा दुखापतीमुळे तो निवृत्त झाला. सेनच्या दुखापतीचे नेमके कारण समजू शकले नाही.
मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी ग•s यांनी चेन झी यी आणि फ्रान्सिस्का कॉर्बेट या अमेरिकन जोडीचा 35 मिनिटांत 21-16, 21-19 असा पराभव करुन उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. महिला एकेरीत आकर्शी कश्यपने जोरदार झुंज दिली. पण तिला जागतिक चौथ्या मानांकित चीनच्या हाय युकडून 58 मिनिटांच्या लढतीत 21-17, 13-21, 7-21 असा पराभव पत्करावा लागला. जागतिक मानांकनात 46 व्या क्रमांकावर असलेल्या आकर्शी कश्यपने चांगली सुरूवात केली. पहिला गेम 21-17 असा जिंकला. तथापि, तिसऱ्या क्रमांकाच्या हानने जोरदार पुनरागमन करत पुढील दोन्ही गेम्स 21-13, 21-7 असे जिंकून कश्यपवर मात केली.









