बर्मिंगहॅम/
जागतिक अग्रमानांकित भारतीय जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांना येथे सुरू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील आव्हान संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या मुहम्मद शोहिबुल फिकरी व बगास मौलाना यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व तनिशा क्रॅस्टो यांचे आव्हानही संपुष्टात आले.
सात्विक-चिराग यांना उपउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियन जोडीकडून 16-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. भारताच्या अग्रमानांकित जोडीने गेल्याच आठवड्यात फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. या सामन्यात प्रतिस्पर्धी जोडीने निर्माण केलेला दबाव झेलता आला नाही आणि तासाभराच्या खेळात त्यांना पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियन जोडीला येथे तिसरे मानांकन मिळाले आहे.
महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व तनिशा क्रॅस्टो देखील उपउपयांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या. त्यांना चीनच्या झँग शु झियान व झेंग यू यांच्याकडून 21-11, 11-21, 11-21 असा पराभव स्वीकारावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व लढत मलेशियाच्या ली झी जियाविरुद्ध होणार आहे. जिया हा 2021 मधील या स्पर्धेचा विजेता आहे. लक्ष्य सेनने उपउपांत्यपूर्व लढतीत जागतिक तिसऱ्या मानांकित अँडर्स अॅन्टोनसेनला तीन गेम्समध्ये पराभवाचा धक्का दिला होता. सेनने ही लढत 24-22, 11-21, 21-14 अशी मात केली. महिला एकेरीत पीव्ही सिंधूचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. तिला कोरियाच्या अग्रमानांकित अॅन से यंगकडून पराभव पत्करावा लागला.









