सिंगापूर ओपन बॅडमिंटनच्या सलामीच्या सामन्यात पराभूत : पुरुष एकेरीत प्रियांशू राजावतही स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या पुरुष जोडीला मंगळवारी पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. डेन्मार्कच्या डॅनियल लुंडगार्ड आणि मॅड्स वेस्टरगार्ड जोडीने भारतीय जोडीला सहज नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय, पुरुष व महिला एकेरीत प्रियांशू राजावत व आकर्षी कश्यप यांचे आव्हान देखील पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या सात्विक आणि चिराग या जोडीने या महिन्याच्या सुरुवातीला थायलंड ओपन सुपर 500 चे विजेतेपद पटकावले होते. पण, सिंगापूर ओपनमध्ये मात्र त्यांना अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. जागतिक क्रमवारीत 34 व्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या डॅनियल-मॅड्स जोडीने भारतीय जोडीला 20-22, 18-21 असा पराभूत केले. हा सामना 47 मिनिटे चालला.
या जोडीशिवाय, या सुपर 750 स्तरावरील स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इतर भारतीय खेळाडूंनाही निराशेचा सामना करावा लागला. आकर्षी कश्यप आणि प्रियांशू राजावत यांनाही आपापल्या श्रेणींमध्ये पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. पुरुष एकेरीत राजावतला हाँगकाँगच्या के लीने 23-21, 21-19 असे तर आकर्षीला थायलंडच्या पोर्नपोईने 21-7, 21-15 असे नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.









