वृत्तसंस्था/ शेनझेन (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र भारताच्या एच. एस. प्रणॉयचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सात्विक-साईराज आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या लिओ कॅमेंडो आणि डॅनियल मार्टीन यांचा 46 मिनिटांच्या कालावधीत 21-16, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सात्विक आणि चिराग या जोडीने चालू वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखताना इंडोनेशिया सुपर 1000 दर्जाच्या, कोरीया सुपर 500 दर्जाच्या आणि स्विस सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. आता चायना मास्टर्स स्पर्धेत सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीचा उपांत्य फेरीचा सामना चीनच्या तिंग आणि झियांग यु या जोडीबरोबर होणार आहे.
पुरूष एकेरीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या कोदाई नाराओकाने भारताच्या एच. एस. प्रणॉयचा 21-9, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. या लढतीमध्ये प्रणॉयला पहिल्या गेममध्ये परितीचे स्मॅश फटके मारण्यासाठी चांगलेच झगडावे लागले. दरम्यान त्याच्याकडून या गेममध्ये वारंवार नियंत्रित चुका झाल्या. हा पहिला गेम नाराओकाने 21-9 अशा फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये नाराओकाने आपल्या अचूक स्मॅश फटक्यावर अधिक भर देत प्रणॉयला दमविले. प्रणॉयकडून या गेममध्ये अनेक चुका झाल्याने त्याचा लाभ नाराओकाने पुरेपूर उठविला. नाराओकाने हा दुसरा गेम 21-14 असा जिंकून प्रणॉयचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.









