अंतिम फेरीत चीनच्या जोडीचे वर्चस्व
वृत्तसंस्था/ क्वालालम्पूर
भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विक-चिराग शेट्टी यांना मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी झालेल्या फायनलमध्ये चीनच्या अव्वलमानांकित लियांग वेई-वांग चांगने भारतीय जोडीचा 21-9, 18-21, 17-21 असा पराभव केला. या पराभवामुळे सात्विकसाईराज व चिराग शेट्टी जोडीला उपजेतेपदावर समाधान मानावे लागले.
यंदाच्या वर्षातील पहिलीच व प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत सात्विक व चिरागने धमाकेदार खेळी करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. रविवारी फायनलमध्ये देखील भारतीय जोडीने पहिला गेम 21-9 असा जिंकत शानदार सुरुवात केली होती. पण दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये त्यांना अपेक्षित खेळ साकारता आला नाही. प्रतिस्पर्धी चीनच्या अव्वलमानांकित जोडीने दुसरा गेम 21-18 तर तिसरा गेम 21-17 असा जिंकत जेतेपदावर कब्जा केला. भारतीय जोडीला मात्र उपजेतेपद मिळाले. अर्थात, मलेशियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी सात्विक-चिराग ही पहिलीच दुहेरीतील भारतीय जोडी आहे. आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला दुहेरीत जेतेपद मिळवता आलेले नाही. यंदा मात्र या स्पर्धेत उपजेतेपद मिळवत भारतीय जोडीने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी साकारली आहे.









