वृत्तसंस्था/ पॅरिस
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुऊष दुहेरीच्या उपांत्य फेरीत चीनच्या 11 व्या मानांकित चेन बो यांग आणि लिऊ यी यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने सात्विक-चिराग जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
भारताचे पदक निश्चित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय पुऊष दुहेरी जोडी बनण्यात ही एकेकाळची जगातील अव्वल क्रमांकाची जोडी अयशस्वी झाली. 67 मिनिटांच्या लढतीत त्यांना 19-21, 21-18, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. 2022 मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर या जोडीचे जागतिक स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे.
शुक्रवारी, आशियाई क्रीडास्पर्धेतील विजेते सात्विक आणि चिराग यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी मलेशियाचे दोन वेळचे ऑलिंपिक पदक विजेते आरोन चिया आणि सोह वुई यिक यांना क्वार्टरफायनलमध्ये पराभूत करून 2011 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेतील भारताची पदकांची मालिका वाढवली. तथापि, भारतीयांचे चिनी जोडीच्या दृढ बचावासमोर काही चालले नाही. चिनी जोडीने स्वत:ला नियमित सावरले आणि अचूकतेने सामना केला. टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक हुकल्यानंतर एका वर्षाने सात्विक आणि चिराग यांनी 2022 साली टोकियोमध्ये प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक जिंकले होते.
या प्रतिष्ठित स्पर्धेतील त्यांचे दुसरे पदक देखील पॅरिस गेम्समध्ये ह्रदयभंग झाल्यानंतर एका वर्षाने नोंदले गेले आहे. यामुळे स्पर्धेतील भारताच्या मोहिमेचाही शेवट झाला आहे. फ्रेंच राजधानीतील मोहिमेचा आढावा घेताना चिराग म्हणाला की, ही खरोखर चांगली कामगिरी होती, काही चांगले सामने आम्ही खेळले, ज्या खेळाडूंविऊद्ध आम्ही जिंकलो नव्हतो अशा खेळाडूंना हरवले. परंतु आम्ही तो अंतिम सामना खेळू शकलो नाही. असे असले, तरी एकंदरित पाहता ही एक चांगली स्पर्धा होती, असे मत त्याने व्यक्त केले.
जानेवारीमध्ये मलेशिया आणि इंडिया ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या जागतिक क्रमवारीतील या तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीसाठी हा हंगाम सातत्यपूर्ण राहिला आहे. परंतु यादरम्यान त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. सात्विकला आरोग्याच्या समस्यांशी झुंजावे लागले आणि चिराग पाठीच्या दुखापतीमुळे अनेक आठवडे बाहेर राहिला. फेब्रुवारीमध्ये वडिलांच्या निधनामुळे सात्विकला वैयक्तिक आघाडीवरही धक्का सहन करावा लागला.









