वृत्तसंस्था / हाँगकाँग
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या हाँगकाँग खुल्या सुपर-500 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरीत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी विजयी सलामी दिली तर पुरूष एकेरीत किरण जॉर्जने पात्र फेरी पार करत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले.
पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी तैवानच्या चियु हेसांग चेई आणि वेंग ची लीन यांचा 21-13, 18-21, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. सात्विक आणि चिराग यांनी अलिकडेच पॅरिसमध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. मात्र हाँगकाँगमधील स्पर्धेत सात्विक आणि चिराग या टॉपसिडेड जोडीला सलामीचा सामना जिंकण्यासाठी तीन गेम्समध्ये लढत द्यावी लागली. सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम 21-13 असा जिंकल्यानंतर तैवानच्या जोडीने दुसरा गेम 21-18 असा जिंकून बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सात्विक आणि चिराग यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत तैवानच्या जोडीचे आव्हान 21-10 असे संपुष्टात आणले.
या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या पात्र फेरीतील पहिल्या सामन्यात भारताच्या किरण जॉर्जने मलेशियाच्या वेईचा 21-14, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव केल्यानंतर पात्र फेरीच्या दुसऱ्या सामन्यात त्याने भारताच्या शंकर मुथुसॅमी सुब्रमणियनचा 21-18, 21-14 असा पराभव करत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले. शंकर मुथुसॅमीने पहिल्या फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या हेंगचा 21-10, 21-15 असा पराभव केला होता. किरण जॉर्जचा पुरूष एकेरीतील पहिल्या फेरीतील सामना सिंगापूरच्या जिया तेहबरोबर होणार आहे. भारताच्या किदांबी श्रीकांतला पात्र फेरीच्या पहिल्या सामन्यात मलेशियाच्या जस्टीन होअने 21-23, 21-13, 21-18 असे पराभूत केले.









