वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या घोषित करण्यात आलेल्या बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांनी मिळविलेले हे आजवरचे सर्वोच्च मानांकन आहे.
नुकत्याच झालेल्या कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद मिळवताना सात्विक आणि चिराग या जोडीने अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या फझर अल्फियान आणि मोहमद रियान अर्देंतो यांचा पराभव केला होता. विद्यमान आशियाई चॅम्पियन्स सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने 2023 च्या बॅडमिंटन हंगामात कोरिया खुली सुपर 500, स्वीस खुली सुपर 300 आणि इंडोनेशिया खुली सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या आहेत. या कामगिरीमुळे सात्विक आणि चिराग या जोडीने 87,211 मानांकन गुण घेत दुहेरीच्या ताज्या मानांकनात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पुरुष दुहेरीच्या मानांकनात यापूर्वी चीनचे लियांग केंग आणि वेंग चँग ही जोडी दुसऱ्या स्थानावर होती. आता सात्विक आणि चिराग यांनी चीनच्या या जोडीला खाली खेचले आहे.
महिला एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताची पी. व्ही. सिंधू 17 व्या स्थानावर आहे. तर सायना नेहवाल 37 व्या क्रमांकावर आहे. पुरुष एकेरीत भारताचा एच. एस. प्रणॉय 10 व्या स्थानावर असून डेन्मार्कचा व्हिक्टर अॅक्सेलसेन पहिल्या स्थानावर आहे. लक्ष्य सेन 13 व्या स्थानावर असून किदाम्बी श्रीकांत 20 व्या स्थानावर आहे.









