वृत्तसंस्था/ सेऊल (दक्षिण कोरिया)
येथे सुरु असलेल्या कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची अव्वल जोडी सात्विकसाईराज-चिराग शेट्टी जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सात्विक-चिराग जोडी वगळता इतर भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेत पहिल्याच दिवशी दिग्गज खेळाडू पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांतचे आव्हान सलामीच्या लढतीत संपुष्टात आले होते. यानंतर एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत देखील पराभूत झाल्याने भारताची मदार सात्विक-चिराग या जोडीवर होती. दरम्यान, या भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारत कोरियन ओपनची सेमीफायनल गाठली आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सात्विक-चिराग जोडीने जपानच्या पाचव्या मानांकित ताकुरो होकी-युगो कोबायाशी जोडीचा 21-14, 21-17 असा पराभव केला. 40 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी जोडीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. या जोरावर सात्विक-चिराग जोडीने पहिला गेम 21-14 असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र जपानच्या ताकुरो-कोबायाशी जोडीने भारतीय जोडीला चांगलीच टक्कर दिली. एकवेळ उभय जोडीत 14-14, 17-17 अशी बरोबरी होती. पण, मोक्याच्या क्षणी सात्विक-चिराग जोडीने खेळ उंचावत हा गेम 21-17 असा जिंकला व उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
आता, उपांत्य फेरीत भारतीय जोडीसमोर चीनच्या 2021 मधील वर्ल्ड चॅम्पियन वेई केंग लियांग-चांग वांग या जोडीचे आव्हान असेल. भारतीय जोडीने गत महिन्यातच इंडोनेशियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले हेते. यामुळे आज होणारा उपांत्य सामना जिंकत भारतीय जोडीचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य असेल.









