चायना मास्टर्स बॅडमिंटन : उपांत्य फेरीत मलेशियन जोडीवर मात
वृत्तसंस्था/ शेनझेन, चीन
हाँगकाँग ओपनमधील उपजेतेपदानंतर सात्विक-चिराग या भारतीय जोडीने आपला दबदबा कायम ठेवताना चायना मास्टर्सची अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना मलेशियन जोडीचा एकतर्फी धुव्वा उडवला. आज, चायना मास्टर्सचे जेतेपद मिळवण्याचा त्यांचा मानस असेल.
शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारतीय जोडीने मलेशियाच्या अॅरोन चिया-सोह वुई यिक जोडीचा 21-17, 21-14 असा पराभव केला. 41 मिनिटे चाललेल्या लढतीत भारतीय जोडीने सुरुवातीपासून आक्रमक खेळताना प्रतिस्पर्धी मलेशियन जोडीला जराही वर्चस्वाची संधी दिली नाही. पहिल्या गेममध्ये सात्विक-चिरागने 6-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर मलेशियन जोडीने काही गुण मिळवत भारतीय जोडीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण, नेटजवळ सात्विक-चिरागने सुरेख खेळ साकारत पहिला गेम 21-17 असा जिंकला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धी मलेशियन जोडीकडून अनेक चुका झाल्या, याचा फायदा भारतीय जोडीने घेतला. एकवेळी उभय खेळाडूत 11-11, 13-13 अशी बरोबरी होती. पण, सात्विक-चिरागने नंतर आपला खेळ उंचावत हा गेम 21-14 असा सहज जिंकला आणि फायनलमधील आपले स्थान निश्चित केले.
आता, जेतेपदासाठी त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या वन हो किम आणि सेऊंग सिओ जोडीशी होईल. कोरियन जोडीने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात फजर अल्फियान-मोहम्मद फिक्री जोडीचा 21-13, 21-17 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.









