मलेशियन ओपन बॅडमिंटन : प्रथमच अंतिम फेरी गाठत रचला इतिहास
वृत्तसंस्था/ लालम्पूर
गतवर्षी तब्बल सात जेतेपदे, एशियन गेम्समध्ये सुवर्ण अशी धमाकेदार कामगिरी केल्यानंतर यंदाच्या वर्षातही भारताच्या सात्विक-चिराग जोडीने आपला धडाका कायम ठेवला आहे. मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ही भारताची पहिलीच दुहेरीतील जोडी आहे. यापूर्वी, भारताच्या कोणत्याही खेळाडूला दुहेरीची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. सात्विक-चिरागने मात्र शानदार खेळाचे प्रदर्शन साकारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या सात्विक व चिराग यांनी उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या कांग मिन-सेओ सेयुंग जोडीचा 21-18, 22-20 असा पराभव केला. 47 मिनिटे चाललेल्या या लढतीत भारतीय जोडीने जबरदस्त खेळ साकारला. जेतेपदासाठी भारतीय जोडीसमोर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानावर असलेल्या चीनच्या वेई केंग व चांग वांग जोडीचे आव्हान असेल.
प्रथमच दुहेरीत भारतीय जोडी अंतिम फेरीत
यंदाच्या वर्षातील प्रतिष्ठेच्या अशा मलेशियन ओपन स्पर्धेत सात्विक-चिराग जोडी वगळता इतर भारतीय खेळाडूंचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. पुरुष दुहेरीत भारताची मदार असलेल्या या भारतीय जोडीने देखील शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात शानदार खेळ साकारला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या भारतीय जोडीने 14-11 अशी पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. प्रतिस्पर्धी कोरियन जोडीने काही गुण मिळवत सात्विक-चिरागला टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. सात्विक-चिरागने पहिला गेम 21-18 असा जिंकत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या गेममध्ये मात्र कोरियन जोडीने जबरदस्त पुनरागमन करताना भारतीय जोडीला चांगलीच टक्कर दिली. विशेष म्हणजे, या गेममध्ये सात्विक-चिरागने 11-8 अशी आघाडी घेतली होती. पण नंतर कोरियन जोडीने 16-16, 18-18, 20-20 अशी बरोबरी साधली. यावेळी दोन्ही खेळाडूंत एकेका गुणासाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. पण, मोक्याच्या क्षणी भारतीय जोडीने आपला खेळ उंचावत हा गेम 22-20 असा जिंकला व अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे, पुरुष एकेरी व महिला एकेरीत भारतीय खेळाडूंनी यशाला गवसणी घातली आहे. पण, दुहेरी प्रकारात भारतीय खेळाडूंना मलेशियन ओपनची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. 1983 नंतर प्रथमच सात्विक-चिराग या भारतीय जोडीने अंतिम फेरी गाठत ऐतिहासिक अशी कामगिरी साकारली आहे. अर्थात, आज अव्वलमानांकित चिनी जोडीला नमवत जेतेपद पटकावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.









