वृत्तसंस्था/ शेनझेन (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या चायना मास्टर्स 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शनिवारी भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली.
शनिवारी झालेल्या पुरूष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात माजी टॉपसिडेड जोडी सात्विक आणि चिराग यांनी चीनच्या तिंग आणि यू यांचा 21-15, 22-20 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. गेल्यावर्षी या जोडीने फ्रेच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले होते. अलिकडच्या कालावधीत सात्विक आणि चिराग यांनी 2023 च्या बॅडमिंटन हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखताना तीन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या. या जोडीने गेल्या वर्षभराच्या कालावधीत आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील जेतेपद त्यानंतर इंडोनेशिया सुपर 1000 दर्जाची, कोरिया सुपर 500 दर्जाची, स्वीस सुपर 300 दर्जाची आणि गेल्या सप्टेंबरमध्ये हाँगझाऊमधील आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक मिळविले आहे.









