वृत्तसंस्था/ हांगझोऊ (चीन)
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पहिले सुवर्णपदक मिळविण्याच्या दिशेने भारताने वाटचाल केली आहे.
पुरुष दुहेरीच्या शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तृतीय मानांकित जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी मलेशियाच्या अॅरॉन चिया आणि सो वुई यिक यांचा 21-17, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 46 मिनिटात पराभव करत अंतिम फेरी गाठली. मलेशियाच्या या जोडीने टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक तर विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात आता भारताचे किमान 1 रौप्यपदक निश्चित झाले आहे. अलिकडेच सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी 2023 च्या बॅडमिंटन हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखत काही स्पर्धा जिंकल्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील सात्विक आणि चिराग ही विद्यमान सुवर्णपदक विजेती जोडी आहे. शनिवारी सात्विक आणि चिराग यांचा अंतिम सामना कोरीयाच्या चोई गेयु आणि किम हो यांच्या बरोबर होणार आहे.









