कोरिया ओपन बॅडमिंटन : चीनच्या अव्वल मानांकित जोडीचा केला पराभव
वृत्तसंस्था/ सेऊल (दक्षिण कोरिया)
सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सात्विक आणि चिराग यांचा सामना 2021 च्या विश्वविजेत्या चीनच्या वेई केंग लियांग आणि चांग वांग या दुसऱ्या मानांकित जोडीचा 21-15, 24-22 असा पराभव केला आणि प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे, गत महिन्यात या भारतीय जोडीने इंडोनेशिया ओपनचे जेतेपद जिंकले होते. यानंतर आता, कोरियन ओपन स्पर्धा जिंकण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल.
शनिवारी झालेल्या पुरुष दुहेरीतील उपांत्य सामन्यात सात्विक-चिराग जोडीने पुन्हा एकदा कमाल करत चिनी वर्चस्व खालसा केले आहे. 40 मिनिटे चाललेल्या या उपांत्य सामन्यात भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. विशेष म्हणजे, भारतीय जोडीचा वेई लियांग-चांग वांग जोडीविरुद्ध पहिलाच विजय ठरला आहे. याआधी झालेल्या दोन्हीही सामन्यात भारतीय जोडीला या चीनच्या अव्वल जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय जोडीसमोर अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो यांचे आव्हान असेल.
सात्विक-चिरागचा धमाकेदार खेळ
सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या सात्विक-चिराग जोडीने पहिल्या गेममध्ये धमाकेदार सुरुवात केली. भारतीय जोडीने 7-5 अशी आघाडी घेतली होती. यानंतर प्रतिस्पर्धी चीनी जोडीने काही गुण मिळवत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला पण आक्रमक खेळणाऱ्या सात्विक-चिरागसमोर त्यांना फारसे गुण मिळवता आले नाही. नेटजवळ भारतीय जोडीने शानदार खेळ साकारत पहिला गेम 21-15 असा जिंकला.
दुसरा गेम मात्र चांगलाच चुरशीचा झाला. दोन्ही जोड्या सुरुवातीला 2-2 आणि 8-8 अशा बरोबरीत होत्या. त्यानंतर भारतीय जोडीने 11-8 अशी आघाडी घेतली. मात्र, चीनच्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले. एक वेळ अशी होती की, दुसऱ्या गेममध्ये गुणसंख्या ही 18-18, 19-19, 20-20 आणि 22-22 अशी बरोबरीत झाली होती. मात्र सात्विक आणि चिराग जोडीने संयम ठेवत व मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत दोन गुणाची कमाई करत हा गेम 24-22 असा जिंकत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
याआधी या भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा सरळ गेममध्ये पराभव केला होता. आता, अंतिम फेरीतही भारतीय जोडीकडून शानदार खेळाची अपेक्षा असणार आहे.









