हाँगकाँग ओपन : मलेशियन जोडीवर मात : लक्ष्य सेनही विजयासह उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
सात्विकसाईराज रंकीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने तीन गेमच्या रोमांचक सामन्यात जुनैद आरिफ आणि रॉय किंग याप या मलेशियन जोडीचा पराभव केला. याशिवाय, पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने मायदेशी सहकारी आयुषला नमवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळणाऱ्या भारतीय जोडीने या लढतीत शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. सात्विक-चिरागने मलेशियन जोडीचा 21-14 असा सहज पराभव केला. पण दुसऱ्या गेममध्ये काही चुका झाल्यामुळे भारतीय जोडीला 20-22 असा पराभव पत्करावा लागला, यामुळे 1-1 अशी बरोबरी झाली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने जोरदार कमबॅक करताना हा गेम 21-16 असा जिंकला आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. हा सामना 64 मिनिटे चालला. आता उपांत्य फेरीत सात्विक-चिरागचा सामना चायनीज तैपेईच्या चेन चेंग कुआन आणि लिन बिंग-वेई यांच्याशी होईल.
लक्ष्य सेनही उपांत्य फेरीत
भारताचा युवा खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानी असलेल्या लक्ष्य सेनने मायदेशी सहकारी आयुष शेट्टीला 21-16, 17-21, 21-13 असे नमवले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना लक्ष्यने पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र त्याला आयुषने चांगलीच टक्कर दिली. नेटजवळ त्याने सरस खेळ करत हा गेम 17-21 असा जिंकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मात्र लक्ष्यने आयुषला जराही संधी न देताना हा गेम 21-13 असा जिंकत सेमीफायनल गाठली. आता, त्याची लढत तैवानच्या चोऊ तियानशी होईल. दुसरीकडे, युवा खेळाडू आयुषने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली पण त्याला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले.









