मलेशियन ओपन बॅडमिंटन : अश्विनी पोनप्पा-तनिषाचीही आगेकूच, के. श्रीकांत पराभूत
वृत्तसंस्था /क्वालालम्पूर
पुरुष दुहेरीत भारताचे आशास्थान व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी आपली विजयी आगेकूच कायम ठेवताना मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात आले गत वर्षात आशियाई स्पर्धेच्या जेतेपदासह अनेक जेतेपद मिळवणाऱ्या सात्विक-चिराग जोडीने यंदाच्या वर्षातही धमाकेदार सुरुवात करताना मलेशियन ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतच्या सामन्यात भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीत 36 व्या स्थानी असलेल्या फ्रान्सच्या लुकास कोर्वी-रोनान लावार जोडीचा 21-11, 21-18 असा पराभव केला. 36 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना जागतिक क्रमवारीत 32 व्या स्थानी असलेल्या चीनच्या जि तिंग व रेन शियांग जोडीशी होईल.
सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या सात्विक-चिराग जोडीने पहिल्या गेममध्ये 11-2 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम ठेवत भारतीय जोडीने पहिला गेम 21-11 असा सहज जिंकला. प्रतिस्पर्धी फ्रान्सच्या जोडीने काही गुण मिळवले खरे पण आक्रमक खेळणाऱ्या सात्विक-चिरागसमोर त्यांचा निभाव लागला नाही. दुसऱ्या गेममध्ये मात्र फ्रान्सच्या जोडीने शानदार सुरुवात करताना 11-4 अशी आघाडी मिळवली होती. पण, मोक्याच्या क्षणी सात्विक व चिराग जोडीने खेळ उंचावताना 16-14 अशी आघाडी घेतली. यानंतर नेटजवळ सरस खेळ साकारत हा गेम 21-18 असा जिंकला व उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.
अश्विनी-तनिषा जोडीही उपांत्यपूर्व फेरीत
दुसरीकडे, महिला दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा व तनिषा व्रॅस्टो जोडीने जपानच्या अनुभवी व सातव्या मानांकित वकाना नागाहारा-मायु जोडीचा 21-19, 13-21, 21-15 असा पराभव केला. 57 मिनिटे चाललेल्या या लढतीत भारतीय जोडीने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन साकारले. पहिला गेम जिंकत भारतीय जोडीने शानदार सुरुवात केली. पण दुसऱ्या गेममध्ये जपानच्या जोडीने पुनरागमन करत हा गेम ज्ंिाकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मात्र भारतीय जोडीने आक्रमक खेळ केला व उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. आता, पुढील फेरीत त्यांची लढत जपानच्या रिवा इवांगा व केई निकांशी जोडीशी होईल.
श्रीकांतचे पॅकअप
पुरुष एकेरीत भारताचे आशास्थान असलेल्या किदाम्बी श्रीकांतला हाँगकाँगच्या लाँग अॅगसने 21-13, 21-17 असे हरवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. श्रीकांतच्या पराभवासह पुरुष एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. आता, या स्पर्धेत भारताची मदार पुरुष दुहेरीत सात्विक व चिराग तर महिला दुहेरीत अश्विनी-तनिषा जोडीवर असणार आहे.









