वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप : महिला दुहेरीत त्रीशा-गायत्रीचा पराभव
वृत्तसंस्था /कोपनहेगन (डेन्मार्क)
येथे सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीत भारताची स्टार जोडी असलेल्या सात्विक-चिराग शेट्टी या जोडीने शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे महिला दुहेरीत मात्र त्रीशा-गायत्री गोपीचंद या जोडीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सात्विक-चिराग जोडीने इंडोनेशियाच्या लियो कॉर्नेडो-डॅनियल मार्टिन या जोडीचा 21-15, 19-21, 21-9 असा पराभव केला. 65 मिनिटे चाललेल्या या रोमांचक सामन्यात भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. पहिला गेम सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये मात्र भारतीय जोडीला एकेका गुणासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. हा गेम गमावल्यानंतर मात्र तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने जबरदस्त पुनरागमन करत हा गेम 21-9 असा जिंकला व उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. महिला दुहेरीत मात्र भारताच्या त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद या जोडीला चिनी तैपेईच्या अग्रमानांकित चेन किंग व जिया फॅन या जोडीकडून 21-14, 21-9 असा पराभव स्वीकारावा लागला. ही लढत 42 मिनिटे चालली. भारतीय जोडीकडून या सामन्यात अनेक चुका झाल्या, याचा फटका त्यांना बसला. दरम्यान, पुरुष एकेरीत लक्ष्य सेन व एचएस प्रणॉय यांनी आपला विजयी धडाका कायम राखला आहे. गुरुवारी रात्री त्यांचे तिसऱ्या फेरीतील सामने होणार आहेत.









