कोरिया ओपन बॅडमिंटन : पुरुष एकेरीत प्रणॉय देखील पराभूत, महिला दुहेरीत त्रीशा-गायत्री यांचे आव्हानही समाप्त
वृत्तसंस्था /सेऊल (दक्षिण कोरिया)
येथे सुरु असलेल्या कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची अव्वल जोडी सात्विकसाईराज-चिराग शेट्टी जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत मात्र एचएस प्रणॉयचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. याशिवाय, महिला दुहेरीत त्रिशा जॉली-गायत्री गोपीचंद यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. बुधवारपासून सुरु झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत पहिल्याच दिवशी पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांतचे आव्हान सलामीच्या लढतीत संपुष्टात आले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी स्टार खेळाडू एचएस प्रणॉयला देखील दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्याला हाँगकाँगच्या ली च्युकने 15-21, 21-19, 18-21 असे पराभूत केले. 64 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयची सुरुवात खराब झाली. पहिला गेम गमावल्यानंतर त्याने पुनरागमन करताना दुसरा गेम जिंकला. पण, तिसऱ्या गेममध्ये त्याच्याकडून अनेक चुका झाल्या, याचा फायदा घेत ली च्युकने हा गेम जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुष एकेरीतील अन्य एका सामन्यात युवा खेळाडू प्रियांशू राजावतला जपानच्या नाराओकाने 14-21, 21-18, 17-21 असे पराभूत केले. अव्वल मानांकन असलेल्या नाराओकाला राजावतने चांगलीच टक्कर दिली पण मोक्याच्या क्षणी केलेल्या चुकांचा त्याला फटका बसला.
सात्विक-चिराग शेट्टी जोडी उपांत्यपूर्व फेरीत
कोरियन ओपन स्पर्धेत पुरुष व महिला एकेरीत दिग्गज खेळाडू स्पर्धेबाहेर होत असताना पुरुष दुहेरीत मात्र भारताच्या सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिसऱ्या मानांकित भारतीय जोडीने तैपेईच्या ही जी तिंग-झोऊ डोंग जोडीचा 21-17, 21-15 असा पराभव केला. 43 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी जोडीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, उपांत्यपूर्व फेरीत त्यांची लढत जपानच्या पाचव्या मानांकित ताकुरो होकी-युगो कोबायाशी जोडीशी होईल. जपानच्या होकी-कोबायाशी जोडीविरुद्ध सात्विक-चिराग यांचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. उभय जोडीत आतापर्यंत चार सामने झाले असून यामध्ये भारतीय जोडीने तीन सामने जिंकले आहेत. महिला दुहेरीत कोरियाच्या ना बेक-ही सो ली जोडीने भारताच्या त्रिशा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीचा 21-11, 21-4 असा एकतर्फी धुव्वा उडवला. 33 मिनिटे चाललेल्या या लढतीत त्रिशा-गायत्री जोडीकडून अपेक्षित अशी कामगिरी झाली नाही.









