मालविका बनसोडकडून गिल्मूर पराभूत
वृत्तसंस्था/ सारब्रुकेन (जर्मनी)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या हायलो खुल्या सुपर-300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडने 2018 साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱया किर्स्टी गिल्मूरला पराभवाचा धक्का दिला.
गुरुवारी पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी इंग्लंडच्या इस्टोन आणि रुस यांचा 22-24, 21-15, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव केला. या लढतीत इंग्लंडच्या जोडीने पहिला गेम जिंकला. त्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर पुढील सलग दोन गेम्स जिंकून इस्टोन आणि रुस यांचे आव्हान संपुष्टात आणले. आता सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना इंग्लंडच्या बेनलेनी आणि सिन व्हेंडे यांच्याशी होणार आहे. अलीकडेच सात्विक आणि चिराग या जोडीने प्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते.
भारताच्या 21 वषीय मालविका बनसोडने महिला एकेरीच्या सामन्यात गिल्मूरचा 24-22, 19-7 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत (उपांत्यपूर्व फेरीत) स्थान मिळविले. आता मालविकाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया तुनजुंग बरोबर होणार आहे. पुरुष एकेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या मर्केलीने भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा 11-21, 21-13, 21-10 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या सायना नेहवालला या स्पर्धेत पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती.









