विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील भारताचे पदक निश्चित
वृत्तसंस्था / पॅरिस
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2025 सालातील विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची टॉप सिडेड जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरूष दुहेरीची उपांत्य फेरी गाठत आपले पदक निश्चित केले आहे. पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी मलेशियाच्या दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या अॅरोन चिया आणि सो वूई इक यांचा 21-12, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. सात्विक आणि चिराग यांच्या या विजयामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील भारताचे पदक निश्चित झाले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मलेशियाच्या चीया आणि इक या जोडीकडून सात्विक आणि चिराग यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे पदक थोडक्यात हुकले होते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील झालेल्या पराभवाची परतफेड सात्विक आणि चिराग या जोडीने पॅरिसमधील विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत केली. सात्विक आणि चिराग या जोडीने 2022 साली झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. भारताच्या या जोडीचे आता या स्पर्धेतील दुसरे पदक निश्चित झाले आहे. 2011 साली झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये भारताच्या ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनाप्पा यांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. आशियाई स्पर्धेतील विजेती जोडी सात्विक आणि चिराग यांचा उपांत्य फेरीचा सामना चीनच्या 11 व्या मानांकीत चेन यांग आणि लियु यी यांच्याबरोबर होणार आहे. या स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाल्याने भारताला या स्पर्धेत पदक मिळविता येईल की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. पण सात्विक आणि चिराग यांनी दर्जेदार कामगिरी करत भारताचे पदक निश्चित केले आहे. सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने आपला उपांत्यपूर्व फेरीचा सामना केवळ 43 मिनिटांत जिंकला. सध्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या दुहेरीच्या मानांकनात सात्विक आणि चिराग या जोडीला नववे स्थान मिळाले आहे. या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चिरागने आपला सर्व्हिस गेम 59 रॅली फटक्यांच्या जोरावर जिंकला. चिरागला सात्विककडून चांगली साथ मिळाली होती. या जोडीने पहिल्या गेम्समध्ये मध्यंतरापर्यंत 11-5 अशी आघाडी घेतली होती. चिरागच्या स्मॅश वेगवान फटक्यासमोर मलेशियाच्या जोडीकडून वारंवार चूका झाल्याने त्यांना हा पहिला गेम 21-12 असा गमवावा लागला. दरम्यान दुसऱ्या गेममध्ये मलेशियाच्या जोडीने सात्विक आणि चिरागला विजयासाठी चांगलेच झुंजविले. सात्विक आणि चिराग या जोडीने दुसरा गेम केवळ 2 गुणांच्या फरकाने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. 2025 च्या बॅडमिंटन हंगामात सात्विक आणि चिराग या जोडीने गेल्या जानेवारीत झालेल्या इंडिया खुल्या तसेच त्यानंतरच्या मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. सात्विकला काही तंदुरुस्तीच्या समस्येमुळे तसेच चिरागलाही पाठ दुखीच्या त्रासामुळे काही आठवडे विश्रांती घ्यावी लागली होती. सिंगापूर खुल्या आणि चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सात्विक आणि चिराग या जोडीने उपांत्य पूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती तर इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.









