तेई झु, शी यु क्वी एकेरीतील विजेते
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या रविवारी येथे झालेल्या इंडिया खुल्या 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना पुरूष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये चीन तैपेईच्या तेई झु हिने महिला एकेरीचे तर शी यु क्वीने पुरूष एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
पुरूष दुहेरीच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या विश्वविजेत्या केंग मिन हेयुक आणि सिओ सेंग जेई यांनी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा 15-21, 21-11, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना सुमारे 65 मिनिटे चालला होता. 2022 साली झालेल्या या स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. तसेच गेल्या आठवड्यात झालेल्या मलेशिया सुपर 1000 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत त्यांना उपविजेतेपद मिळाले होते. या अंतिम लढतीत सात्विक आणि चिराग यांनी आपल्या स्मॅश फटक्याच्या जोरावर पहिला गेम 21-15 असा जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये कोरियाच्या जोडीने त्यांना नमवित बरोबरी साधली. तिसरा आणि शेवटचा गेम अपेक्षेप्रमाणे चुरशीचा झाला. कोरियाच्या बॅडमिंटनपटूंनी आपले स्मॅशचे फटके नेटजवळ मारत सात्विक आणि चिराग यांना कोर्टवर चांगलेच नाचविले. सात्विक आणि चिराग यांना परतीचे फटके मारताना बरेच अवघड गेल्याने त्यांना गुण गमवावे लागले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीन तैपेईच्या तेई झु यांगने चीनच्या चेन यु फेईचा 21-16, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. तेई झुचे या स्पर्धेतील हे पहिलेच जेतेपद आहे. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात चीन तैपेईच्या शी यु क्वीने हाँगकाँगच्या बलाढ्या ली चेयुक युचा 23-21, 21-17 असा पराभव करत अजिंक्यपद मिळविले. गेल्या वर्षी क्वीने या स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविले होते. या सामन्यात चीन तैपेईच्या क्वीने क्रॉस कोर्ट स्मॅश फटक्यावर अधिक भर दिला होता. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील अंतिम सामना क्वी आणि यु यांच्यात झाला होता.
सदर स्पर्धेमध्ये थायलंडच्या पी. देचपॉल आणि टी. सेपसिरी यांनी मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविताना चीनच्या जियांग बेंग आणि वेई झीन यांचा 21-16, 21-16 असा फडशा पाडला. जपानच्या मेयु मात्सुमोटो आणि वेकाना निगाहेरा यांनी महिला दुहेरीचे विजेतेपद पटकाविताना चीनच्या झेंग झियान आणि झेंग यु यांचा 21-12, 21-13 असा पराभव केला.









