वृत्तसंस्था/ झेनजेन
रविवारी येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या चायना मास्टर्स सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चीनच्या लियांग वेई केंग आणि वेंग चँग यांनी विजेतेपद मिळविले.
पुरूष दुहेरीच्या झालेल्या अंतिम फेरीतील सामन्यात चीनची टॉप सिडेड जोडी लियांग आणि वेंग यांनी जवळपास 75 मिनिटांच्या कालावधीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान 21-19, 18-21, 21-19 अशा गेम्समध्ये संपुष्टात आणले. या लढतीमध्ये चीनच्या लियांग आणि वेंग यांनी पहिला गेम जिंकून अघाडी मिळविल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी दुसरा गेम 21-18 असा जिंकून बरोबरी केली. पण तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये चीनच्या जोडीने आपल्या वेगवान स्मॅश फटक्यावर सात्विक आणि चिराग यांचे आव्हान 21-19 असे संपुष्टात आणत विजेतेपद हस्तगत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी चीनच्या लियांग आणि वेंग यांचा पराभव केला होता. तर या पराभवाची परतफेड लियांग आणि वेंग यांनी करत विजेतेपद पटकाविले. 2023 च्या बॅडमिंटन हंगामात पाच स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. विश्व बॅडमिंटन फेडरेशनने विश्व टूरवरील होणाऱ्या स्पर्धा सहा प्रकारात विभागण्यात आल्या आहेत. सुपर 1000 च्या चार स्पर्धा, सिक्स सुपर 750 दर्जाच्या सहा स्पर्धा, सुपर 500 च्या सात स्पर्धा तर सुपर 300 च्या अकरा स्पर्धा निश्चित केल्या आहेत. सुपर 1000 दर्जाच्या स्पर्धेमध्ये अधिक गुण तसेच मोठी बक्षीस रक्कम दिली जाते.









