वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बॅडमिंटनमधील भारताची दुहेरीची सर्वोत्तम जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी ही जगातीलही सर्वोत्तम जोडी ठरली असून दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत त्यांनी अग्रस्थानी झेप घेतली आहे. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत या जोडीने भारताला बॅडमिंटनचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
बीडब्ल्यूएफने जाहीर केलेल्या ताज्या मानांकनात सात्विक-चिराग यांनी दोन स्थानांची प्रगती करीत पहिल्या स्थानी मजल मारत माजी महान खेळाडू प्रकाश पडुकोन, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळविला. दोघेही राष्ट्रकुल व आशियाई चॅम्पियनशिप्सचे विद्यमान सुवर्णविजेते असून गेल्या रविवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम लढतीत त्यांनी द.कोरियाच्या चोई सॉलग्यू व किम वोन्हो यांच्यावर मात करून जेतेपद पटकावले. या जोडीने गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविले होते. त्यांनी एकत्र खेळताना या वर्षीचे पहिले जेतेपद स्विस ओपन स्पर्धेत मार्चमध्ये मिळविले. त्यानंतर एप्रिलमध्ये दुबईतील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पटकावले. जूनमध्ये इंडोनेशिया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावत बीडब्ल्यूएफ सुपर 1000 स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय जोडी होण्याचा मान मिळविला. त्यानंतर त्यांनी कोरिया ओपन सुपर 500 स्पर्धा जिंकून मानांकनात आगेकूच कायम ठेवली.
अन्य भारतीयांमध्ये महिला एकेरीत पीव्ही सिंधूने दोन स्थानांची प्रगती करीत 13 वे स्थान मिळविले आहे तर पुरुष एकेरीत आशियाई स्पर्धेत कांस्य जिंकणारा एचएस प्रणॉयची एका स्थानाने घसरण झाली असून तो आता आठव्या स्थानावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक सुवर्ण मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या लक्ष्य सेनने आपले दोन्ही सामने जिंकले. पण मानांकनात त्याचीही एका स्थानाने घसरण झाली असून तो आता 15 व्या स्थानावर आहे. किदाम्बी श्रीकांतला एका स्थानाची बढत मिळाली. तो 20 व्या स्थानावर आहे तर महिला दुहेरीची जोडी गायत्री गोपीचंद व त्रीशा जॉली यांनीही एका स्थानाची बढत मिळवित 16 वे स्थान मिळविले आहे.









