वृत्तसंस्था/ टोकियो
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या जपान खुल्या सुपर 750 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. भारताची दुहेरीतील जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे लक्ष्य या स्पर्धेतील विजेतेपदावर राहिल. सात्विक आणि चिराग यांनी नुकतेच कोरीया बॅडमिंटन स्पर्धेतील दुहेरीचे जेतेपद मिळविले आहे. दरम्यान पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करतील.

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दुहेरीचे सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी हे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी अलिकडच्या दोन महिन्यांच्या कालावधीत दर्जेदार कामगिरी करत काही स्पर्धा जिंकल्या आहेत. रविवारी कोरियन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी टॉप सिडेड जोडी अल्फियान आणि मोहम्मद रियान आर्दियांतो यांचा पराभव करुन विजेतेपद मिळविले. सात्विक आणि सिराज या जोडीने अलिकडच्या कालावधीत सलग 10 सामने जिंकले आहेत. या जोडीने स्विस खुली, एशियन चॅम्पियनशिप, इंडोनेशिया खुली स्पर्धा जिंकल्या आहेत. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांची सलामीची लढत इंडोनेशियाच्या कॅमेंडो आणि डॅनियल मार्टीन यांच्याशी होणार आहे. आता पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेला आज सोमवारपासून एक वर्ष बाकी राहिले आहे.

दरम्यान महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू तसेच प्रणॉय गमवलेला सूर मिळविण्यासाठी झगडत असून 2023 च्या बॅडमिंटन हंगामात विश्व बॅडमिंटन टूरवरील झालेल्या 12 पैकी 6 स्पर्धांमध्ये सिंधूला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. जपान बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा सलामीचा सामना चीनच्या झेंग मेनशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये भारताचा एच. एस. प्रणॉय याचा पहिल्या फेरीतील सामना चीनच्या ली फेंगशी होणार आहे. तसेच किदांबी श्रीकांतचा पहिल्या फेरीतील सामना चीन तैपेईच्या चेनशी होणार आहे. भारताच्या प्रणॉयने गेल्या मे महिन्यात मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.









