डी. एन. ए. सिनेमा : कोल्हापूरच्या गौतम पंगू यांची ऐतिहासिक निर्मिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया ज्या ‘कलापूर’ कोल्हापूरने भक्कम केला त्याच कोल्हापुरातील आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे वास्तव्य असलेल्या गौतम दिलीप पंगू यांनी आपला सांगलीचा मित्र आशय जावडेकर याच्या साथीने अमेरिकेत पहिला मराठी चित्रपट निर्माण करून नवा इतिहास घडवला आहे. 2019 मध्ये बनलेल्या या ‘डी. एन. ए.’ नावाच्या चित्रपटाचे प्रदर्शन कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी शनिवार 9 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी गौतम पंगू हे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर शहरातील ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळेच्या पिछाडीस असणाऱया पंगूवाडय़ात लहानाचा मोठा झालेला गौतम दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेला होताच. पुढे त्याने रसायन अभियांत्रिकी या क्षेत्रात संशोधन करून पीएच. डी. संपादन केली आणि आता तो अमेरिकेतील औषध निर्माण क्षेत्रामध्ये संशोधन कार्यरत आहे. लहानपणापासून लेखनाचा छंद जपणाऱया गौतम पंगू यांनी संशोधन कार्यात नावलौकिक कमवत असतानाही विविध प्रकारचे मराठी लेखन करणे सुरू ठेवले आहे. विशेषतः परदेशात स्थलांतरित भारतीयांच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू ते आपल्या लेखनातून सातत्याने हाताळत असतात.
महाराष्ट्रातील आणि अमेरिकेतीलही विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे ललित लेख, माहितीपर लेख आणि कथा सातत्याने प्रकाशित होत असतात. ‘स्टोरी टेल’ या ऑडिओ बुकसाठीदेखील त्यांनी काही कथा लिहिलेल्या आहेत. गौतम व आशय जावडेकर यांची भेट झाल्यानंतर त्या दोघांनी ‘शँक्स’ हा लघुपट व ‘डी. एन. ए.’ हा चित्रपट यांच्या पटकथा परस्परसहकार्याने लिहिल्या आणि आशय जावडेकरांनी या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेषतः ‘डी. एन. ए.’ला परदेशातील विविध महोत्सवात चांगली दाद मिळाली आहे आणि आता हा चित्रपट फिल्म सोसायटीमुळे कोल्हापुरातील रसिकांनाही पाहता येणार आहे.
फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी ‘डी. एन. ए.’ या चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, पालकत्व म्हणजे डी. एन. ए. म्हणजेच केवळ गुणसूत्रे पुढच्या पिढीकडे केवळ संक्रमित करणे नव्हे याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. डी. एन. ए. संदर्भातील काही आजार असलेल्या महिलांना अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून मायटोकॉन्ड्रिया डोनेशनसारख्या पद्धती वापरणे आणि त्यासाठी वैज्ञानिक प्रयोग करणे याच्या नैतिक, कायदेशीर व अन्य बाजूंविषयीही काही सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. प्राजक्ता करंदीकर, मैत्रेयी साने, अक्षय आणावकर, ग्लेन गुयेर, मानसी बेडेकर आदी कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केलेल्या आहेत.









