वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थायलंड खुल्या 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरूष दुहेरी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या भारतीय जोडीने उपांत्यफेरीच्या सामन्यात चीन तैपैईच्या जोडीचा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला.
शनिवारी झालेल्या पुरूष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात सात्त्विक आणि चिराग या जोडीने चीन तैपैईच्या लू मिंग ची आणि तेंग केई वेईचा 21-11, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा उपांत्यफेरीचा सामना सात्त्विक आणि चिराग यांनी केवळ 35 मिनिटात जिंकला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सात्त्विक आणि चिराग यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. सात्त्विक आणि चिराग ही भारतीय जोडी सध्या दुहेरीच्या मानांकनात तिसऱ्या स्थानावर असून थायलंड स्पर्धेत या जोडीला मानांकनात अग्रस्थान देण्यात आले आहे. दुहेरीच्या अन्य एका उपांत्य सामन्यात चीनच्या चेन बो यांग आणि लियू यी या जोडीने दक्षिण कोरियाच्या किम जंग आणि किम रेंग यांचा 21-19, 21-18 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. सात्त्विक आणि चिराग या भारतीय जोडीचा दुहेरीचा अंतिम सामना चीनच्या यांग आणि यी यांच्याशी रविवारी खेळविला जाईल. 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 साली सात्त्विक आणि चिराग या भारतीय जोडीने बँकांकच्या या स्पर्धेत आपले पदार्पण करताना दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. 2024 च्या बॅडमिंटन हंगामात सात्त्विक आणि चिराग या जोडीने विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या टूरवरील स्पर्धांमध्ये चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. मलेशिया सुपर 1000 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्त्विक आणि चिराग यांनी उपविजेतेपद तसेच इंडियन सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद त्याचप्रमाणे गेल्या मार्चमध्ये झालेल्या फ्रेंच सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले आहे.
महिलांच्या दुहेरीच्या उपांत्य सामन्यात भारताच्या चौथ्या मानांकीत तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांची गाठ थायलंडच्या पी रेविंदा आणि केजाँगकोलपन यांच्याशी होणार आहे. तनिशा आणि अश्विनी या भारतीय जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या लिम आणि चेन यांचा 21-15, 21-23, 21-19 असा पराभव केला.









