अध्याय अकरावा
ज्या प्रकारचे ज्ञान माणसामध्ये उपजतच असते त्यानुसार तो कृती करत असतो. सात्विक, राजस आणि तामस हे ज्ञानाचे तीन प्रकार आपल्याला माहीत आहेत. माणसाच्या पूर्वकर्मानुसार त्याचा पुनर्जन्म कुठे कधी होणार हे नियती ठरवत असते. तसेच त्याचा स्वभावही तीच ठरवते व त्यानुसार त्याच्या हातून कर्मे घडत असतात. साहजिकच तीही तीन प्रकारची असतात. त्या त्या कर्मानुसार कर्त्याचेही तीन प्रकार होतात असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
धैर्योत्साही समोऽ सिद्धौ सिद्धौ चाविक्रियस्तु यऽ ।
अहंकारविमुक्तो यऽ स कर्ता सात्त्विको नृप ।।18।।
अर्थ- हे नृपा, धैर्य व उत्साह यांनी युक्त, सिद्धि आणि असिद्धि यांचे ठिकाणी समान, अविक्रिय इष्टानिष्टप्राप्तीमुळे ज्याच्यामध्ये फरक होत नाही अस़ा, अहंकाराने विमुक्त असतो तो सात्त्विक कर्ता होय.
विवरण-सात्विक कर्माबद्दल सांगून झाल्यावर सात्विक कर्त्याबद्दल सांगताना बाप्पा म्हणाले, निस्वार्थपणा हा सात्विक कर्त्याचा मुख्य गुण असल्याने तो करत असलेले प्रत्येक कर्म हे समाजाच्या भल्यासाठीच असते. फळाची अपेक्षा नसल्याने आसक्ती, दु:ख, नैराश्य, वैफल्य हे त्याला जाणवत नाहीत. त्यामुळे तो सतत उत्साही असतो. सात्विक कर्ता समाजाच्या समृद्धीसाठी झटणारा असतो हे सर्व तो निस्वार्थपणे करत असतो. पुढील श्लोकात बाप्पा राजस कर्त्याची वैशिष्ट्यो सांगत आहेत.
कुर्वन्हर्षं च शोकं च हिंसां फलस्पृहां च यऽ ।
अशुचिर्लुब्धको यश्च राजसोऽ सौ निगद्यते ।। 19।।
अर्थ- जो हर्ष, शोक, हिंसा व फलेच्छा करतो, जो अशुचि व लोभी असतो त्याला राजस कर्ता म्हणतात.
विवरण- राजस कर्त्याला समोर दिसणाऱ्या गोष्टीत अत्यंत प्रेम असतं. त्यामुळे त्याचा मोह त्याला कधी स्वस्थ बसू देत नाही आणि त्या मोहाचे लोभात रूपांतर कधी झाले ते त्याचे त्यालाही कळत नाही. त्याला सतत निरनिराळ्या इच्छा होत असतात आणि त्यांच्या पूर्तीसाठी तो सतत राबत असतो. त्यासाठी न्याय अन्याय, नैतिक, अनैतिक या कशाचीही त्याला चाड नसते. हा सतत असमाधानी असतो. त्याच्यावर सुखदु:खाचा सतत मारा होत असल्याने तो शेवटी हतबल व निराश होतो. पुढील श्लोकात बाप्पा तामस कर्त्याविषयी बोलत आहेत,
प्रमादाज्ञानसहितऽ परोच्छेदपरऽ शठऽ ।
अलसस्तर्कवान्यस्तु कर्तासौ तामसो मतऽ ।। 20।।
अर्थ- प्रमाद उन्मत्तपणा व अज्ञान यांनी युक्त, दुसऱ्यांच्या नाशाविषयी तत्पर, शठ, आळशी, वितंडवादी असलेल्या कर्त्याला तामस कर्ता म्हणतात.
विवरण-तामस कर्ता कामचुकार असतो आणि तसे असण्याबद्दल त्याला कोणताही खेद किंवा खंत वाटत नाही. कामामध्ये लबाडी करणे, आळसाने चालढकल करणे, स्वत:च्या मताबद्दल दुराग्रही असणे, कोणताही विधिनिषेध न बाळगणे, चांगल्या गोष्टींचा विध्वंस करणे ही तामसी कर्त्याची वैशिष्ट्यो होत. राजस कर्त्यापेक्षा तामसी कर्ता अधिक भयानक असतो. पुढील श्लोकातून बाप्पा सुखं आणि दु:खही तीन प्रकारची असतात असं सांगत आहेत.
सुखं च त्रिविधं राजन्दु:खं च क्रमतऽ शृणु ।
सात्त्विकं राजसं चैव तामसं च मयोच्यते ।। 21 ।।
अर्थ- हे राजन् सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे सुख आणि दु:ख मी क्रमाने सांगतो. ते ऐक.
विवरण- जगात प्रत्येक जण सुखासाठी धडपडत असतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असली तरी बहुतांशी ती भौतिक गोष्टींशी निगडित असते. त्या वस्तू मिळाल्या की, सुख मिळेल तसेच काहींना काही व्यक्तींच्या सहवासातून सुख मिळेल तसेच काहींना विशिष्ट परिस्थिती आपल्याला सुखी करेल असे वाटत असते पण वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती या गोष्टी कायम टिकणाऱ्या नसल्याने त्या नष्ट झाल्या किंवा बदलल्या की, मनुष्य दु:खी होतो.
क्रमश:








