अध्याय अकरावा
मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करावी लागली की, मनुष्य दु:खी होतो. दु:खाचेही तीन प्रकार असतात. कोणतेही धर्मकार्य करताना सुरवातीला श्रम करावे लागतात. ह्या शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसानीमुळे मनुष्य दु:खी होतो ह्याला सात्विक दु:ख असे म्हणतात. सुरवातीला या गोष्टी दु:खदायक वाटतात पण नंतर केलेल्या धर्मकार्यांच्या फळाच्या स्वरूपात सुख मिळणार असते.
विषयोपभोग मिळण्यासाठी जी साधना केली जाते ती करताना साधना करण्यात जे दु:ख भोगावे लागते त्याला राजस दु:ख असे म्हणतात. राजस सुखं देणाऱ्या व्यक्ती, वस्तू वा परिस्थिती या कायम टिकणाऱ्या नसल्याने अंतिमत: मनुष्य दु:खी होतो. व्यसनासाठी आवश्यक त्या गोष्टी मिळवण्यासाठी जे दु:ख सोसावे लागते ते तामस दु:ख होय. अशाप्रकारे नशापाणी करून मनुष्य स्वत:च्या शरीराची हानी करून घेतो. थोडक्यात एक सात्विक दु:ख सोडलं तर इतर दु:खातून आणखी दु:खाची निर्मिती होते हे लक्षात घेऊन माणसानं होताहोईतो त्याचा स्वभाव सात्विक करण्याचा प्रयत्न करावा.
पुढील श्लोकातून बाप्पा सात्विक, राजस आणि तामस सुखाबद्दल सांगत आहेत. अर्थातच सात्विक सुख हेच खरे सुख असून राजस व तामसी सुखे हे दु:खानी पांघरलेलेले वेष असतात.
विषवद्भासते पूर्वं दु:खस्यान्तकरं च यत् ।
इष्यमानं तथाऽ वृत्त्या यदन्तेऽ मृतवद्भवेत्
प्रसादात्स्वस्य बुद्धेर्यत्सात्त्विकं सुखमीरितम् ।। 22 ।।
अर्थ- अगोदर जे विषाप्रमाणे भासते, जे दु:खाचा अंत करणारे असते, वरचेवर आल्याने ज्याच्या विषयी इच्छा वाढते, जे शेवटी अमृताप्रमाणे होते आणि स्वत:च्या बुद्धीच्या प्रसन्नतेने जे मिळते, त्या सुखाला सात्विक सुख म्हणतात.
विवरण- सुख ही मनाची एक अवस्था आहे. सात्विक सुख मिळत असताना मन प्रसन्न असते परंतु ते मिळवण्यासाठी सुरवातीला क्लेष, दु:ख व कष्ट होतात. निरनिराळे संस्कार, विषयवासना, राग द्वेष, काम क्रोधादी विकार यामुळे मन अस्वस्थ असते. अशा अस्वस्थ मनाला संयमित करणे क्लेशकारक असते. मन घट्ट करून मनाला विषयांपासून दूर करावे लागते, त्यासाठी दैवी गुणांच्या संपत्तीचा उदय केला म्हणजे मन शुद्ध, अंतर्मुख व विकाररहित होते. भोगापेक्षा त्यागातून मिळणारा आनंद अनंत पटीने अधिक असतो हे मनाला पटवून द्यावे लागते. अशी खटपट सतत करत राहिले की मन शांत, स्थिर व स्वस्थ होते. हीच आनंदाची परमोच्च अवस्था असून त्यातून प्रसादरूपी सात्विक सुख मिळते. आधी कष्टप्रद असलेल्या पण नंतर परमोच्च आनंदाची प्राप्ती करून देणाऱ्या सात्विक सुखाबद्दल सांगून झाल्यावर बाप्पा पुढील श्लोकात राजसी सुखाबद्दल सांगत आहेत.
विषयाणां तु यो भोगो भासतेऽ मृतवत्पुरा ।
हालाहलमिवान्ते यद्राजसं सुखमीरितम् ।।23।।
अर्थ- विषयांचा भोग अगोदर अमृताप्रमाणे भासतो आणि अंत हालाहालाप्रमाणे होतो त्या सुखाला राजस सुख म्हणतात.
विवरण- समोर दिसणाऱ्या गोष्टीतून मिळणारं सुख हे राजस सुख असतं. या सुखाचा आनंद ज्ञानेंद्रियांमार्फत घेतला जातो. या सुखाचा उपभोग घेत असताना माणसाला तात्पुरता आनंद मिळतो. असा तात्पुरता आनंद मिळायचं बंद झालं की, मनुष्य दु:खी होतो म्हणून ते सुख पुन:पुन्हा मिळत राहावं अशी त्याला इच्छा होत राहते. जरी ते पुन:पुन्हा मिळत राहिलं तरी त्यातून मनुष्याची कधीच तृप्ती होत नाही. आपण अतृप्त आहोत आणि कायम अतृप्तच राहणार आहोत हे लक्षात येऊन तो अधिकच दु:खी होतो. म्हणून बाप्पा म्हणतायत की, सुख आधी अमृताप्रमाणे वाटलं तरी नंतर ते विषासारखं काम करतं. थोडक्यात आधी देहकष्ट होऊन नंतर सात्विक सुख समाधान देतं तर आधी अमृतासमान गोड वाटणारं पण नंतर विषासमान काम करणाऱ्या सुखाला राजस सुख म्हणतात.
क्रमश:








