वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत मंगळवारी येथे यजमान आणि विद्यमान विजेता गुजरात टायटन्स व मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. या सामन्यात गुजरात संघासमोर खेळताना मुंबई इंडियन्सला गोलंदाजीची समस्या सुधारावी लागेल.

या स्पर्धेमध्ये मुंबई इंडियन्सच्या मोहिमेला चांगला प्रारंभ झाला नाही. त्यांना पहिले सलग दोन सामने गमवावे लागले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सने सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करत सलग 3 सामने जिंकून मुसंडी मारली. दरम्यान शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाकडून त्यांना 13 धावांनी पराभव पत्कारावा लागला. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून यापैकी 3 विजय व 3 पराभव नोंदविले असून हा संघ 6 गुणासह सातव्या स्थानावर आहे. दरम्यान विद्यमान विजेता गुजरातचा संघ 6 सामन्यातून 4 विजय आणि 2 पराभवासह 8 गुण नोंदवित चौथे स्थान गुणतक्त्यात मिळविले आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांना शेवटच्या पाच षटकात चांगली गोलंदाजी करता आली नाही. या शेवटच्या पाच षटकामध्ये पंजाबने 96 धावा झोडपल्या होत्या. नवोदित अर्जुन तेंडुलकर, बेरेनडॉर्फ, ग्रीन आणि आर्चर या चारीही गोलंदाजांनी आपल्या चार षटकामध्ये 40 पेक्षा अधिक धावा दिल्या होत्या. मात्र अनुभवी पीयुष चावला आणि शोकिन या फिरकी गोलंदाजांनी पंजाबची फटकेबाजी थोडीफार रोखली. मुंबईची फलंदाजी गेल्या चार सामन्यात बऱ्यापैकी झाली असून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीने डावाला समाधानकारक सुरुवात करुन दिली आहे. सूर्यकुमार यादवला फलंदाजीचा सूर मिळाल्याने मुंबई इंडियन्स संघाच्या दृष्टीकोनातून ही महत्त्वाची बाब ठरली आहे. कॅमेरुन ग्रीन, डेव्हिड यांची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि ग्रीन या जोडीने 36 चेंडूत 75 धावांची भागिदारी केली होती. पण त्यानंतर अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीने सामन्याला कलाटणी मिळाली.
गुजरात टायटन्सने आतापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली असल्याने त्याने आतापर्यंत 4 सामने जिंकत 8 गुण मिळविले आहेत. मात्र गुजरात संघाला यापूर्वीच्या सामन्यात लखनौ संघाविरुद्ध खेळताना शेवटच्या काही षटकांमध्ये धावांसाठी झगडावे लागले होते. गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्यात गुजरातकडून लखनौला विजयासाठी 136 धावांचे आव्हान मिळाले होते. आणि लखनौची 14 षटकाअखेर स्थिती 1 बाद 105 अशी भक्कम होती. पण त्यानंतर गुजरात संघातील गोलंदाज मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सामन्याला कलाटणी दिली. लखनौला शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 12 धावांची गरज होती. पण मोहित शर्माच्या या शेवटच्या षटकात लखनौला झगडावे लागले. गुजरात टायटन्सतर्फे अनुभवी मोहम्मद शमी हा सातत्याने बळी मिळवत आहे. दरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याने आतापर्यंत या स्पर्धेत गोलंदाजीत एक बळी मिळविला आहे. तर फलंदाजीत एकमेव अर्धशतक झळकवले आहे. रशिद खान, नूर अहमद आणि जयंत यादवने हे गुजरात संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आहेत. जयंत यादवने यापूर्वीच्या सामन्यात आपल्या शेवटच्या दोन षटकात 7 धावा दिल्या. तर नूर अहमदने आपल्या शेवटच्या दोन षटकात 5 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद करुन गुजरात संघाला विजय मिळवून दिला होता. गेल्या सामन्यामध्ये साहा, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांनी अधिक धावा जमवल्या होत्या. मंगळवारच्या सामन्यात कदाचित डेव्हिड मिलरला फलंदाजीत बढती दिली जाईल असा अंदाज आहे.
गुजरात टायटन्स – हार्दिक पांड्या (कर्णधार), एस. भरत, जोसेफ, लिटल, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी, दर्शन नलकांडे, नूर अहमद, उर्विल पटेल, रशिद खान, साहा, साईकिशोर, साईसुदर्शन, सांगवान, शनाका, विजय शंकर, मोहित शर्मा, शिवम मावी, शुभमन गिल, ओडेन स्मिथ, राहूल तेवातिया, मॅथ्यू वेड, जयंत यादव, यश दयाल.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, डेव्हिड, ब्रेव्हिस, तिलक वर्मा, इशान किशन, टी स्टब्ज, विष्णू विनोद, कॅमेरुन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, रमनदीप सिंग, मुल्लानी, मेर्डिथ, वधेरा, शौकिन, अर्शद खान, जेनसेन, पीयुष चावला, कुमार कार्तिकेय, राघव गोयल, आर्चर, बेरेनडॉर्फ, मधवाल.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.









