काही घरांवर झाड कोसळून हानी : नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली : अग्निशामक दलाची विशेष कामगिरी
वाळपई : गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागलेली आहे. शुक्रवारी दुपारी वादळीवारा झाल्यामुळे सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. अनेकांच्या घरावर झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात हानी आहे. केरी येथील द्रौपदी भिवा गावस यांच्या घरावर झाड पडल्यामुळे सुमारे 1.50 लाख ऊपयांच हानी झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून ग्रामीण भागात रस्ता वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. दरम्यान, गेल्या 24 तासांत 5.50 इंच पावसाची नोंद झाली असून एकूण सरासरी पाऊस 48 इंच झालेला आहे. अनेक भागात पडलेली झाडे अग्निशामक दलाने हटवून रस्ते मोकळे केले आहेत. तर उर्वरित ठिकाणची झाडे दूर करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विविध ठिकाणी पडझडीच्या घटना
गेल्या 24 तासांमध्ये वाळपई अग्निशामक दलाने एकूण दहा ठिकाणी निर्माण झालेल्या अडचणी दूर केलेले आहेत. अधिकारी संतोष गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार मोर्ले या ठिकाणी सखाराम मळीक यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. ही नुकसानी मोठ्या प्रमाणात असल्याचे संतोष गावस यांनी स्पष्ट केले. झाड हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरू होते. सकाळी नगरगाव रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर नवोदय विद्यालयाच्या रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. झर्मे रस्त्यावर काजूचे झाड पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. वाळपई वन कार्यालयासमोर झाड पडल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली. चरवणे येथील देविदास गावस यांच्या घरावर झाड पडल्यामुळे मोठी हानी झाली. घरातील सामान पावसाने भिजल्यामुळे सदर कुटुंबाला नुकसानीला सामोरे जावे लागले. अग्निशामक दलाच्या पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता वाचविण्यासाठी कामगिरी केली. महत्त्वाचे म्हणजे नगरगाव पंचायत क्षेत्रातील ब्रह्मकरमळी देवस्थान परिसरातील 200 वर्षांचे वडाचे झाड जमीनदोस्त झाले. चरावणे येथील नवनाथ गावस यांच्या घरावर बाजूचे पत्र पडल्यामुळे छपराचे काही प्रमाणात नुकसाने झाले. दलाच्या जवानांनी सदर अडचणी दूर केले. तसेच वाळपई सरकारी सामाजिक ऊग्णालयासमोर मशिदीच्या परिसरामध्ये झाड पडल्यामुळे काही प्रमाणात नुकसानी झाली.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
सत्तरी तालुक्यातील दमदार पाऊसामुळे म्हादई, रगाडा, वेळूस, वाळवंटी या नद्यांच्या पाणी पातळी आता वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस लागत असल्यामुळे पाण्याची पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. कर्नाटक भागातील डोंगराळ भाग व चोरला घाट परिसरातील डोंगराळ भागांमध्ये गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदीची पाणी पातळी वाढल्याचे चित्र आहे.
24 तासांत 5.50 इंच पाऊस
प्राप्त माहितीनुसार गेल्या, 24 तासांमध्ये सत्तरी तालुक्यात एकूण 5.50 इंच पावसाची नोंद झाली आहे .यामुळे एकूण पाऊस 48 इंच झालेला आहे तालुक्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लागत आहे. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत.
केरी येथील द्रौपदी गावस हतबल
केरी येथील द्रौपदी भिवा गावस यांच्या घरावर झाड पडल्यामुळे दीड लाख ऊपयांची हानी झाली. त्यांच्या घरात कमवता कोणी नाही. यामुळे सध्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. घरावर झाड पडल्यामुळे या कुटुंबासमोर बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे स्थानिक आमदारांनी या कुटुंबाला मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.









