कार्यकारिणीचा आज अधिकारग्रहण समारंभ
बेळगाव : बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बेळगावमधील कापड व्यापारी सतीश तेंडोलकर यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकातील सर्वात जुने, मोठी वस्त्रे, सिल्क आणि हँडलूम व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या या असोसिएशनमध्ये 500 हून अधिक सभासद आहेत. या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ मंगळवार दि. 28 रोजी दुपारी 12.30 वाजता हॉटेल आदर्श पॅलेस येथे होणार आहे. सतीश तेंडोलकर हे 95 वर्षांची परंपरा असलेल्या खडेबाजार येथील एम. एस. टेक्सटाईल हाऊसचे संचालक आहेत. ते मागील अनेक वर्षांपासून बेळगावच्या व्यापारी व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. वयाच्या 35 व्या वर्षी ते बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्वात तरुण अध्यक्ष झाले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली गोवा सरकारने बेळगावच्या व्यापाऱ्यांवर लावलेला एन्ट्री टॅक्स रद्द करण्यात आला होता. नैर्त्रुत्य रेल्वेच्या सल्लागार समितीमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून तसेच पोस्ट फोरमचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. बेळगावमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सिटीझन्स कौन्सिलच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविला आहे.









