कारवार : येथील काळी नदीवरील नवीन पुलावर पथदीपांची तात्पुरती का होईना व्यवस्था केल्यानंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर या पुलावर कायमस्वरूपी पथदीपांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. गेल्या बुधवारी काळी नदीवरील सुमारे एक किलोमीटर लांबीचा जुना पूल अचानकपणे कोसळला. त्यानंतर जुन्या पुलाला समांतर असलेला तेवढ्याच लांबीचा नवा पूल चर्चेत आला. जुना पूल कोसळल्यानंतर आता सर्व वाहतूक नवीन पुलावरून वळविण्यात आली आहे. जुना पूल कोसळण्यापूर्वी सदाशिवगडहून कारवारकडे होणारी वाहतूक जुन्या पुलावरून आणि कारवारहून सदाशिवगडकडे होणारी वाहतूक नवीन पुलावरून होत होती. आता नवीन पुलावरील वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे.
तथापि नवीन पुलाच्या मध्यभागी आणि सदाशिवगडच्या बाजूने पथदीपांची व्यवस्था नसल्याने पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे विशेष करून पादचाऱ्यांची व सायकलस्वारांची कुंचबणा होत होती. कारवारच्या बाजूने कारवार नगरपालिकेने हायमास्टची व्यवस्था केल्याने, तेवढी काय समस्या नव्हती. तथापि पुलाच्या मध्यभागी आणि सदाशिवगडच्या बाजूला पुलावर काळोखाचे साम्राज्य पसरले होते. काळोखात ये-जा करणाऱ्यांच्या त्रासाची जाणीव झालेल्या येथील एका संघटनेने आणि काही समाजसेवकानी नवीन पुलावर तातडीने पथदीपांची व्यवस्था करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारच्या अधिकाऱ्यांनी नवा पूल बांधलेल्या आयआरबी बांधकाम कंपनीला पथदीपांची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यानुसार आयआरबी कंपनीने पुलाच्या मध्यभागी आणि सदाशिवगडच्या बाजूला फोकस दीपांची तात्पुरती व्यवस्था केली आहे. त्यामुळे जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.









