सर्वच प्रवाशांना मिळतोय दिलासा : तब्बल साडेतीन वर्षांनंतर वाढीव तिकीट दरात करण्यात आली कपात
बेळगाव : रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वेच्या तिकीट दरात कपात केल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. बेळगावमधून धावणाऱ्या सेकंड ऑर्डिनरी (पॅसेंजर) एक्स्प्रेसला तिकीट दर कमी झाला आहे. यामुळे मिरज ते हुबळी हा प्रवास कमी तिकीट दरात करता येत असल्याने नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, विक्रेते यांना याचा सर्वाधिक फायदा होऊ लागला आहे. कोरोनाकाळात रेल्वेप्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी पॅसेंजरच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. तिकीट दर दुपटीने वाढल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. पॅसेंजर रेल्वेचे तिकीट दर हे एक्स्प्रेस इतकेच करण्यात आले. तब्बल साडेतीन वर्षांनंतर वाढीव तिकीट दर रेल्वेने मागे घेतले. दि. 21 फेब्रुवारी रोजी नैर्त्रुत्य रेल्वेने एक परिपत्रक काढून तिकीट दर कमी केला जात असल्याचे स्पष्ट केले. बेळगाव-मिरज हा प्रवास करण्यासाठी पूर्वी 65 रुपये तिकीट दर आकारला जात होता. परंतु, दर कमी करण्यात आल्याने आता केवळ 35 रुपयांमध्ये हा प्रवास करता येत आहे. मिरज-कॅसलरॉक-मिरज, हुबळी-मिरज-हुबळी, लोंढा-मिरज-लोंढा या पॅसेंजरना तिकीट दर कमी करण्यात आला आहे. यामुळे बेळगावमधून लोंढा, कॅसलरॉक, धारवाड, हुबळी, घटप्रभा, कुडची, मिरज असा प्रवास करणे सोयीचे ठरत आहे.
बेळगाव-मिरज पॅसेंजर सुरू करण्याची मागणी
सध्या लोंढा-मिरज मार्गावर तीन पॅसेंजर धावत आहेत. परंतु, प्रवाशांच्या संख्येच्या मानाने त्या कमी असल्याने बेळगाव-मिरज पॅसेंजर पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. कोरोनापूर्वी बेळगाव-मिरज पॅसेंजर सुरू होती. परंतु, कोरोनानंतर ती सुरू झाली नसल्याने प्रवाशांना इतर एक्स्पे्रसवर अवलंबून रहावे लागत आहे.









