नदी-नाले प्रवाहित : शेतकरीवर्ग सुखावला, पिकांना पोषक वातावरण
बेळगाव : मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाले काही प्रमाणात प्रवाहित झाले आहेत. चार ते पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. कधी कमी प्रमाणात तर कधी जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मार्कंडेय नदी दुथडी भऊन वाहू लागली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. यावर्षी नदीला पाणी येणार की नाही? अशी भीती लागून होती. जोरदार पावसामुळे शेतीला पोषक वातावरण झाले आहे. पिकांनाही पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तर तालुक्याच्या उत्तर विभागात नट्टी लावण्यास प्रारंभ झाला आहे. दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या. सततच्या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून राहिले आहे. तसेच अनेक भागात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. याचबरोबर पावसाच्या रिमझिममुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यातील नदी-नाल्यांमध्ये पहिल्यांदाच पाणी आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी तब्बल दीड महिना उशिराने पावसाने हजेरी लावली. वळीवाच्या पावसानेही दडी मारल्याने अनेक ठिकाणी पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली होती. कधी एकदा मोठा पाऊस होतो आणि कधी समस्या मिटणार अशा विवंचनेत सारेच होते. दरम्यान राकसकोपच्या पाणीपातळीतही वाढ होत असल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. पावसाला जोरदार सुऊवात झाली आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. कारण विहिरींची पाणीपातळी वाढण्यासाठी अजूनही पावसाची गरज आहे. झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतामधील कामांनाही वेग आला आहे. तसेच नदी, नाल्यांमधील पाणीही वाढले आहे. विहिरींच्या पाणी पातळीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या दोन चार महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून जिल्ह्याच्या सर्रास भागात पावसाची रिमझिम सुऊ आहे. अजून काही दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास पाणी पातळीत चांगलीच वाढ होणार आहे. पाच दिवसांपासून सुऊ असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दिसून येत आहे. काही भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवरील ख•dयात पाणी साचल्याने नागरिकांना व वाहन चालकांना यातून वाट काढताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांवर असलेले ख•s बुजविणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सध्या रस्त्यांवऊन प्रवास करताना शहर वासीयांना चांगलाच ताप सहन करावा लागत आहे. संततधार पावसाने अनेक विक्रेत्यांची तारांबळ उडत आहे. तसेच बाजारपेठेतील गर्दीही पावसामुळे ओसरली आहे. याचबरोबर सततच्या पावसामुळे भाजी विक्रेते, विद्यार्थी, दुचाकीस्वार, फेरीवाले यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या जोराने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतामधील कामांनाही जोर आला आहे. चातका प्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला असून येणाऱ्या दिवसांतही चांगला पाऊस पडावा, अशीच अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
‘राकसकोप’मध्ये अडीच फुटाने वाढ
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात 24 तासांत 103.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 673.6 मि. मी. पाऊस झाल्याने मंगळवारी सकाळी नोंद झालेल्या 2453.25 फूट पाणीपातळीत 2.55 (अडीच फूट) फुटाने वाढ होत पाणीपातळी 2455.80 फूट झाली आहे. बुधवारी दिवसभर दमदार पाऊस झाल्याने सायंकाळी 6 वाजेपर्यंत सव्वादोन फूट आणखी पाणीपातळी वाढल्याने पाणीपातळी 2458 फुटावर गेली आहे. 1 जुलै रोजीच्या डेडस्टॉकमधील पाणीपातळीत 11 फुटाने वाढ झाली आहे. यापैकी पावणे पाच फूट पाणीपातळी ही मंगळवारी सकाळपासून बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या 36 तासांत वाढली आहे. नदी-नाले मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यास फायदेशीर ठरणार आहे. जलाशय पाणलोट क्षेत्रातील बेटगिरी (ता. खानापूर), बैलूर, मोरब (ता. खानापूर), बाकमूर, तुडये (ता. चंदगड), मळवी यासह बेळवट्टी, बडस (ता. बेळगाव) परिसरात बुधवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. जलाशयातील 2465 फुटापर्यंतची पाणीपातळी ही मार्कंडेय नदी पात्राला समांतर असल्याने झपाट्याने कमी पावसातही वाढते. त्यापुढील 2475 फुटापर्यंतची दहा फूट पाणीपातळी भरण्यास पाण्याचा विस्तार वाढल्याने मोठ्या पावसाची गरज भासते.









