सरासरीपेक्षा बारा टक्के अधिक : एकूण पाऊस झाला 62 इंच
पणजी : गोव्याला गुऊवारी सायंकाळपासून पावसाने झोडपून काढले. सरासरी 5 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद शुक्रवारी पहाटे झाली. यंदाच्या मौसमातील हा एका दिवसांत पडलेला सर्वाधिक पाऊस आहे. आतापर्यंत मौसमी पाऊस 62 इंच एवढा झालेला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो 12 टक्के अधिक आहे. आज, उद्या पावसाचा जोर थोडा कमी राहील. तसेच 17 व 18 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. संपूर्ण गोव्याला बुधवारी रात्रभर झोडपून काढले. यामुळे राज्यातील नद्यांच्या जलस्तरही बराच वाढला होता. गुरुवारी दिवसभर पाऊस पडला. गोव्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला आहेच शिवाय अपेक्षेपेक्षाही जादा 10 इंच पाऊस पडलेला आहे. गेल्या चोवीस तासांत संपूर्ण गोव्यात सरासरी 5 इंच पाऊस पडलेला असता तरी वाळपई व सांखळीमध्ये कमी पाऊस झाला.
आगामी 48 तासांमध्ये मध्यम तथा किरकोळ स्वऊपाचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 6.5 इंच पाऊस जुने गोवे येथे पडला. केपे, सांगे, पेडणे येथे प्रत्येकी 6 इंच, फोंडा व म्हापसा येथे प्रत्येकी 5.25 इंच पाऊस पडला. पणजी, मडगाव, मुरगाव व दाबोळी येथे प्रत्येकी 5.50 इंच, तर वाळपई, सांखळी व कोणकोण येथे प्रत्येकी 3.50 इंच एवढी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत संपूर्ण गोवाभर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे गोव्यात पडलेल्या पावसाची एकूण नोंद 62 इंचापर्यंत पोहोचली. गोव्यात सरासरी पेक्षेही 10 इंच जादा पाऊस झालेला आहे आणि राज्यातील सर्व धारणांमध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे. अणजुणे धरण आता पाव टक्के भरलेले आहे. तिळारीचा जलसाठा बराच वाढलेला आहे. साळावली धरण लवकरच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.









